दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

चक्रवर्ती सम्राट अशोकाचं साम्राज्यहे प्राचीन जगातील खरंखुरं लोककल्याणकारी राज्य ! –

सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर

नाशिक दि. ५ एप्रिल:
तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणुकीनुसार चालणारं चक्रवर्ती सम्राट अशोकाचं साम्राज्य हे प्राचीन जगातील खरंखुरं लोककल्याणकारी राज्य होतं, म्हणूनच आधुनिक जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र घडविणाऱ्या नवस्वतंत्र भारताच्या निर्मात्यांनी आदर्श राज्य व्यवस्थेसाठी चक्रवर्ती सम्राट अशोक निर्मित प्रतीकांचा राष्ट्रीय चिन्ह म्हणून अभिमानानं स्वीकार करण्याचा निर्णय घेतला असावा, असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष तथा सद्धम्म पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर यांनी नाशिक पुना रोड स्थित डॉ.आंबेडकर नगर येथे केले.
येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृहात समस्त नाशिककर जनतेच्या वतीनं चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा २३२९ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्या प्रसंगी प्रा. देवडेकर यांच्या व्याख्यानाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पालि भाषेचे तज्ज्ञ आणि बौद्ध धम्माचे अभ्यासक आयु. संतोष जोपुळकर हे होते.
प्रा. आनंद देवडेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात घडलेल्या महत्वाच्या घटनांशी संबंधित ठिकाणी चक्रवर्ती सम्राट अशोकांनी निर्माण केलेल्या पुरातात्विक पुराव्यांच्या आधारे भगवान बुद्धांचं ऐतिहासिकत्व तर सिद्ध झालंच परंतु पुढे प्रतिक्रांतीत नष्ट करण्याचा प्रयत्न केलेल्या या पुरातन अवशेषांच्या संशोधनाआधारेच भारतात आज बौद्ध धम्म पुनर्स्थापित झाला आहे. चक्रवर्ती सम्राटांच्या राजाश्रयानं मोगलीपुत्त तिस्स यांच्या नेतृत्वाखाली पाटलीपुत्र येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या धम्म संगीतीमुळं बौद्ध धम्मात घुसलेल्या सतरा पाखंडाचं खंडण होऊन मूळ बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार सर्वदूर झाला होता. हा इतिहास लक्षात घेऊन बौद्ध झालेल्या समाजानं जबाबदारीनं वागायला हवं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनाने आपल्याला केवळ बौद्ध धम्माचाच वारसा मिळाला नसून या धर्मांतराने आपल्याला बौद्ध धम्माच्या गौरवशाली इतिहासाचा आणि वैभवशाली संस्कृतीचा समृद्ध वारसाही प्राप्त झाला आहे. हा वारसा जतन करण्याची जबाबदारी ओळखून बौद्ध धम्माच्या संवर्धनास्तव प्रेरणा घेण्यासाठी यापुढे वस्त्यावस्त्यांतून चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचं कृतज्ञताभावे आयोजन करायला हवे, असेही प्रा. देवडेकर आपल्या भाषणात शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु संतोष जोपुळकर यांनी सम्राट अशोक जयंती उत्सवाचं औचित्य सांगून सम्राट अशोकांच्या शिलालेखांची थोडक्यात माहिती दिली.
भदन्त धम्मधनपालो आणि डॉ. आंबेडकर नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष आयु. दीपक ननावरे यांच्या प्रमुख उपस्थितीसह जाणकार आणि अभ्यासू श्रोत्यांनी खच्चून भरलेल्या सभागृहात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. भारत तेजाळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रा. खरे यांनी केलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!