कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा; दोन मंडळांत जोरदार हाणामारीसह दगडफेक, तिघे जखमी

दि.28. गणेश विसर्जन मिरवणूक मुख्य मार्गात आधी प्रवेश करण्यावरून दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांत रात्री साडेअकराच्या दरम्यान जोरदार वाद व हाणामारी झाली. त्यातून दगडफेकही झाली. यात देखावे पाहण्यासाठी आलेल्या दोघांसह एकूण तिघे जखमी झाले.
पोलिसांनी वेळीच दखल घेत दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना पांगवल्याने अनर्थ टळला; मात्र या प्रकाराने खरी कॉर्नर परिसरात तणाव निर्माण झाला होता. विसर्जन मिरवणुकीत वेळीच प्रवेश मिळावा, यासाठी काही मंडळांनी रात्रीच ट्रॅक्टर- ट्रॉली देखावा सजावटीचे साहित्य घेऊन मिरवणूक मार्गावर येण्यास सुरुवात केली होती.
दांडगाईवाडीकडील एका मंडळाची ट्रॉली व कार्यकर्ते खरी कॉर्नरकडून मुख्य मार्गाकडे येण्याचा प्रयत्न करीत होते. याचवेळी खरी कॉर्नरजवळ थांबलेल्या दुसऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यातून वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर मारामारीत झाले. पाठोपाठ दगडफेक सुरू झाली.
देखावे पाहण्यासाठी कुटुंबीयांसमवेत आलेले लोक सैरावैरा धावू लागले. दगडफेकीत तिघे जखमी झाले. याच वेळी बंदोबस्तासाठी असलेले पोलिसांचे पथक घटनास्थळी धावले. त्यांनी लाठ्या उगारत कार्यकर्त्यांना पांगवले. याच वेळी पोलिसांची आणखी एक तुकडी तेथे दाखल झाली.
पोलिसांनी खरी कॉर्नरकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिस गाडी लावून दंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. याच वेळी काही कार्यकर्ते वाद घालू लागल्याने त्यांना ताब्यात घेण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला. तेव्हा कार्यकर्ते बाजूला गेले. जखमी झालेल्या तिघांना खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत