देशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मारकडवाडीच्या ग्रामस्थांना सलाम !


हुकूमशाही भित्री असते. बुळगी असते. फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र लागतात. भले ते हुकूमशहांच्या ‘सो कॉल्ड’ महाशक्तीपुढे संख्येनं कमी असतील… पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात.

‘आमच्या गांवातनं भाजपाला ऐंशी टक्के मतदान होऊच शकत नाही. इव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आहे. भलेही आमचा उमेदवार जिंकूदेत… पण आमच्या गांवातनं त्याला कमी झालेले मतदान हा आमच्या खुद्दारीवर लागलेला कलंक आहे.. आमचे गांव गद्दारी करणार नाही आणि गद्दारांना साथ देणार नाही.’ ही अस्वस्थता त्यांचं मन खाऊ लागली… शेवटी सगळ्या गांवानं ठरवलं की आपल्यापुरतं बॅलेट पेपरवर मतदान घेऊया. किमान आपल्या काळजाला लागलेली टोचणी तरी थांबेल.
मतदानाची तारीख पक्की झाली : तीन डिसेंबर.

…आणि काल अचानक पाच डिसेंबरपर्यन्त मारकडवाडीवर जमावबंदीचा आदेश लादला गेला आहे. मराठा मोर्चावर झालेला लाठीचार्जासारखं बातम्यात ‘प्रशासन-प्रशासन’ असं म्हणायचे आदेश आले असावेत. पण प्रशासनाला कुणाचे आदेश जातात हे पब्लिकला कळतं. तरीही ग्रामस्थांनी निर्धार केलाय, “लाठीचार्ज सहन करू, गोळ्या झेलू… पण मतदान होणारच” !

ही खरी छ. शिवरायांच्या आणि शाहु फुले आंबेडकरांच्या विचारांची भुमी ! इतिहासातनं प्रेरणा घ्यायची असते ती अशी. अहो, औरंगजेब सुद्धा महाशक्ती होता. जगातल्या पाच महाबलाढ्य बादशहांपैकी एक. अफगाणिस्तानपासून आसामपर्यंन्त त्याची सत्ता होती. शिवरायांकडचे अनेक सरदार, सरंजामदार, वतनदार ईडीला घाबरुन पळाल्यागत औरंगजेबाला सामील झाले होते. महाराष्ट्राची माती त्याला विकायची सगळी तजवीज त्या गद्दारांनी केली होती… पण अशाच लढवय्या वृत्तीच्या मुठभर मावळ्यांना सोबत घेउन छ. शिवराय आणि शंभुराजे पितापुत्रांनी औरंग्याला तब्बल अठ्ठावीस वर्ष झुंजवलं होतं. शेवटी त्याची कबर या महाराष्ट्रात खणावी लागली !

मारकडवाडीकरांनी क्रांतीची तुतारी फुंकत बंडाची पहिली मशाल पेटवली आहे. त्यांच्या उद्याच्या पिढ्या अभिमानानं सांगतील की लोकशाहीची हत्या होत असताना मारकडवाडी गांवानं आपलं इमान आणि सत्त्व जागं ठेवलं होतं.

जय शिवराय..! जय भीम !

  • किरण माने.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!