दलित और मुसलमान तो हमारे जेब मे है, उनको झक मारकर हमे वोट देना पडता है.
हे वक्तव्य कॉंग्रेसच्या एका दिवंगत नेत्याचं आहे. या नेत्याचं दिल्ली दरबारी प्रचंड वजन होतं. प्रवक्ता म्हणून असाधारण कामगिरी पार पाडल्यानंतर स्वत: वाजपेयींनी या नेत्याचं कौतुक केलं होतं. त्यांची पत्रकार परीषद असेल तेव्हां वर्तमानपत्राचे संपादक आपल्या बेस्ट पत्रकाराला पाठवत. त्यांच्याकडून पत्रकारांना नेहमी एखादी बातमी मिळायची, शिवाय विविध विषयातली त्यांच्याकडे असलेली माहिती आणि नंतर अनौपचारिक गप्पा. या अनौचारिक गप्पांमधून पत्रकारांचे राजकीय शिक्षण व्हायचे.
एका पत्रकाराने या नेत्याला अशा खासगी गप्पांत प्रश्न विचारला होता कि भाजप नेहमी मुस्लिम अनुनयाचा प्रचार करतो, दलितांना खिरापत वाटण्यासंबंधी भाजप लोकांना भडकवत असतो. यावर कॉंग्रेसचे काय म्हणणे आहे हे कळत नाही.
त्या वेळी या नेत्याने त्या पत्रकाराला जे सांगितले ते आजही खरे आहे. माझा भाऊ पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना या पत्रकाराने हा किस्सा सांगितला होता. त्याचा आशय इथे लिहीतो कारण नेमके शब्द आता सांगणे कठीण आहे.
कॉंग्रेस मुस्लिमांना सत्तेत योग्य तो वाटा देत नाही. मुस्लिमांना नोकर्या नाहीत. सरकारी नोकरीत १९४७ च्या आधी त्यांचे प्रमाण ३३% इतके होते. स्वातंत्र्यानंतर ते ०.०.१% इतकेच आहे. तरीही कॉंग्रेस मुस्लीम अनुनय करते असे म्हणणे चुकीचेच आहे. पण जेव्हां आमच्यावर असा आरोप होतो तेव्हां आम्ही उत्तर देत नाही. कारण त्यामुळे मुस्लिम वस्त्यात भाजपच आमचा प्रचार करतो. या जोडीला मग आम्ही मशीदीची पडलेली भिंत बांधून देणे, रंगसफेती करणे अशी कामे करतो. वास्तविक मुस्लिमांचे एक गठ्ठा बारा टक्के मतदान कॉंग्रेसला होते. या हिशेबाने त्यांना बजेटमधून बारा टक्के निधी दिला तर मुस्लीम वस्त्यांचा कायापालट होईल. शिक्षण, नोकरीत मुस्लिमांची टक्केवारी राखली तर त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. पण मुस्लिमांनी पाकिस्तान घेतल्याने कॉंग्रेस मुसलमानांना काहीही देत नाही. काहीही न करता जर भाजपच्या भयाने ते आम्हाला मत देत असतील तर आम्हाला का नको ?
दुसरीकडे भाजपच्या संविधान बदलू या घोषणेने भाजपला फक्त कॉंग्रेसच रोखू शकते या भयाने दलित सुद्ध मुसलमानांप्रमाणे आमच्या खिशात आहेत. दलित वस्त्यात बुद्धविहार बांधणे, समाजमंदीर बांधणे, बाबासाहेबांचा पुतळा उभारणे या कामांच्या बदल्यात जर आम्हाला पाच वर्षे टर्म मिळत असेल तर हे किरकोळ खर्च करायला कॉंग्रेसला कसलीच अडचण नाही. बजेटमधे दलितांसाठी निधी ठेवावा लागतो. पण जर दलित पुतळा, विहार यातच खूष असतील तर एखाद्या दलित नेत्याला समाजकल्याण देऊन तो निधी वळवता येऊ शकतो.
त्यांचे हे वक्तव्य किती खरे आहे ?
तर सच्चर आयोग कॉंग्रेसने नेमला होता. या आयोगाचा रिपोर्ट कार्यकर्त्यांनी स्वत: शोधून वाचावा. दलितांपेक्षा भारतात मुस्लिमांची स्थिती दयनीय आहे असा या आयोगाचा रिपोर्ट आहे. कॉंग्रेसने हा आयोग नेमला पण कृती काहीच केली नाही. मग आयोग का नेमला ?
कारण मुसलमानांची जी स्थिती आहे ती कॉंग्रेसच्या काळात झालेली आहे. याचाच अर्थ मुस्लीम अनुनयाचा आरोप खोटा आहे हे कॉंग्रेसला भाजपकडे वळत चाललेल्या हिंदू मतदाराच्या ध्यानात आणून द्यायचं होतं. कॉंग्रेस कधीच थेट बोलत नाही. जितेंद्रप्रसाद कि आणखी कुठल्या तरी एका कॉंग्रेसच्या सरचिटणिसांनी एकदा पत्रकारांशी बोलताना सांगितले होते कि मुस्लिम अनुनयाचा आरोप खरा असता तर दंगलीत मुस्लिमांचे नुकसान झाले असते का ? सच्चर आयोगाच्या अहवालाने हे सिद्ध केले आहे कि कॉंग्रेसने मुस्लिमांचा अनुनय केलेला नाही. त्यांच्या अवस्थेबद्दल आम्ही चिंतित आहोत.
हा अहवाल अशा काळात आला मुस्लिमांचा कॉंग्रेसवर राग होता. त्यांनी बाबरी पतनानंतर कॉंग्रेसाला मत देणे थांबवले होते. मोदींच्या उदयानंतर मुसलमान कॉंग्रेसकडे वळला.
आज जसा मुसलमान वळला आहे आणि फुकटात मत देत आहे तसाच दलित आज ना उद्या भाजपच्या लाथा खाऊन आपल्याकडे वळेल या माजात कॉंग्रेस नेते आहेत. आरक्षणात क्रिमीलेयर आणा, वर्गीकरण करा, आरक्षण संपवा, अक्षय भालेरावच्या खून्याला उमेदवारी द्या, भाजपतून आलेल्या नानाला प्रदेश अध्यक्ष बनवा, बाबासाहेबांच्या नातवाला भाजपचा हस्तक म्हणा दलित लाचार होईपर्यंत भाजपला सत्ता द्यायची आणि त्यांच्या दलितविरोधी कारवायात साथ द्यायची हे कॉंग्रेसचे धोरण आहे.
२००४ ते २०१३ या काळात महाराष्ट्रात कॉंग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना ४५०० दलित अत्याचाराच्या प्रकरणात फक्त ४% प्रकरणे निकाली निघाली. यात काही प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले तर अन्य प्रकरणे प्रलंबित असून आरोपी जामीनावर फिरत आहेत. तरीही दलित कॉंग्रेसलाच मत देईल हा कॉंग्रेसचा विश्वास आहे कारण भाजपचे भय दाखवून काहीही न करता मत मिळते हा अनुभव आहे.
यालाच ते नेते म्हणाले होते कि दलित और मुसलमान हमारे जेब मे है.
Mandar Mane.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत