महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

शाहू महाराज ,गंगाधर कांबळे यांचा स्मृति स्तंभ आणि आम्ही.

प्रा.डॉ. भीमराव खाडे.

अशातच कोल्हापूर या ठिकाणी एका पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने मी आणि माझे मित्र प्रा.डॉ. सुरेश शेळके सपत्निक गेलो होतो.
कोल्हापूर भेटीच माझ्यासाठीच आकर्षण होत शाहू पॅलेस आणि गंगाधर कांबळे यांना शाहू महाराजांनी सुरू करून दिलेल सत्य सुधारक चहाच हॉटेल.
सकाळी फ्रेश झाल्या नंतर ब्रेकफास्ट करून आम्ही गंगाधर यमाजी कांबळे यांच हॉटेल शोधत निघालो.
आता त्या ठिकाणी हॉटेल नाही पण त्या हॉटेलच्या आणि गंगाधर कांबळे यांच्या स्मरणार्थ त्या हॉटेलच्या जागेवरच तेथील कार्यकर्त्यांनी एक स्मृतिस्तंभ उभारला आहे.त्या स्पॉटला पोहोचल्या नंतर मी शेळके सरांना म्हनालो…
सर,
शाहू महाराज या ठिकाणी आपल्या सहकार्यासोबत चहा घेण्यासाठी येत असत…
आपणही या स्पॉटवर चहा घेतली पाहिजे. सरांनी लगेच बाजूच्या ठेल्यावर जाऊन आम्हा चौघा साठी चहा आणली.
चहाचे ग्लास आमच्या हातात दिले आणि ज्या गंगाधर कांबळे च्या हॉटेलवर शाहू महाराज आपल्या मित्र मंडळीला घेऊन चहा घेत असत त्या स्पॉटवर आम्ही चौघांनी महाराज आणि गंगाधर कांबळे यांना अभिवादन केल.
गंगाधर कांबळे यांचा ऐतिहासिक प्रसंग सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठीचे महाराजांनी दिलेल उत्तुंग उदाहरण आहे.
गंगाधर कांबळे यांची ही घटना तर आपणा सर्वांना माहीतच असेल…कोणताही व्यक्ती जर शाहू महाराजांवर भाषण करीत असेल तर त्याचं भाषण गंगाधर कांबळे यांचे हे उदाहरण दिल्याशिवाय पूर्ण होतच नाही.
सोशल जस्टिस म्हणजेच सामाजिक न्याय आणि सामाजिक न्याय कशाला म्हणतात?त्याचं हे महत्त्वाचे उदाहरण.
गंगाराम कांबळे यांची नेमकी कथा काय आहे?
शाहू महाराजांवर ज्यांनी ज्यांनी पुस्तके लिहिलेली आहेत त्या सर्व पुस्तकांमध्ये या कथेचा समावेश प्रामुख्याने वाचायला मिळतो.मी सुद्धा ही कथा पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ओरिएंटेशन प्रोग्रॅममध्ये आदरणीय उत्तम कांबळे सरांकडून ऐकली आणि त्याचबरोबर डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संपादित आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेला राजर्षी शाहू स्मारक ग्रंथा मध्ये वाचली.
गंगाराम यमाजी कांबळे हे शाहू महाराजांच्या दरबारामध्ये सरकारी पागेतील मोतदार या पदावर कार्य करीत होते.एके दिवशी गंगाधर कांबळेनी घोड्याला पिण्यासाठी असलेल्या हौदातील पाण्याला स्पर्श केला. पाण्याला स्पर्श का केला म्हणून दरबारातील काही जणांनी गंगाधर कांबळे ची पाठ रक्तबंबाळ केली.ही घटना जेव्हा घडली तेव्हा शाहू महाराज दिल्ली या ठिकाणी गेले होते. दिल्लीहून परत आल्यानंतर गंगाधर कांबळे कुठे दिसत नसल्यामुळे त्यांनी चौकशी केली आणि गंगाधर कांबळे यांना बोलून घेतले.अनुपस्थित राहिल्याचे कारण विचारल्या नंतर गंगाधर कांबळे यांनी त्याची चाबुकाने बडवून काढलेली पाठ महाराजांना दाखविली. गंगाधर कांबळेची रक्तबंबाळ झालेली पाठ पाहिल्यानंतर शाहू महाराजांनी गांगरामला मारणारांना बोलून घेतलं आणि सर्वांची पाठ फोडून काढली.हे झाल्यानंतर महाराज म्हणाले चल आता उद्यापासून कामाला ये.गंगाधर कांबळे स्वाभिमानी ते म्हणाले माफ करा महाराज मी आता या ठिकाणी काम करू शकणार नाही,बाहेर कुठेही काम करील.महाराज म्हणाले ठीक आहे आणि नंतर महाराजांनी गंगाधर कांबळे यांना चहाचं हॉटेल टाकून दिलं त्या हॉटेलचं नाव होतं सत्यसुधारक हॉटेल. महाराजांनी पुन्हा विचार केला, हा अस्पृश्य समाजाचा माणूस त्याच्या हॉटेलवर कोण चहा पिणार. यासाठी शाहू महाराज दररोज आपल्या घोडागाडी मध्ये आपल्या सहकाऱ्यांना,मित्रांना घेऊन गंगाधर कांबळे यांच्या हॉटेलवर चहा पिण्यासाठी जात असत. गंगाधर कांबळे सुद्धा रिस्पेक्टफुली ट्रेमध्ये चहा घेऊन महाराजांकडे जायचां, महाराज सुद्धा आनंद घेत घेत चहा पीत असत आणि चहा पीत पीत इतरांना सांगायचे अरे वा,किती छान चहा झाला आहे.
झाला का नाही? असं म्हटलं की बाकीचे म्हणायचे हो हो खूप छान चहा झाला आहे.मी जर या ठिकाणी चहा घेतला, तर माझं पाहून इतरही लोक या ठिकाणी चहा पिण्यासाठी येतील आणि गंगाधर कांबळेचा आर्थिक प्रश्न सुटेल असं महाराजांना वाटायचं.यालाच सामाजिक न्याय असं म्हटलं जातं. या प्रसंगाला आधुनिकतेची जोड देऊन उत्तम कांबळे सर हा प्रसंग भाषणाच्या माध्यमातून रंगवताना म्हणतात… अशाप्रकारे महाराज हे गंगाधर कांबळेच्या हॉटेलचे एका अर्थाने ब्रँड अँबेसिडरच होते.
मी एक विज्ञानाचा विद्यार्थी आणि रसायनशास्त्राचा संशोधक मार्गदर्शक असल्यामुळे पुढे गंगाधर कांबळेचं काय झालं? हा प्रश्न माझ्यासमोर नेहमीच असे याही प्रश्नाचे उत्तर मला डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या राजश्री शाहू स्मारक ग्रंथ यात मिळाले.
गंगाधर कांबळे यांच्या जीवनात महाराजांनी केलेल्या या क्रांतीमुळे पुढे गंगाधर कांबळे हे अस्पृश्य समाजाचे प्रतिष्ठित पुढारी झाले,अस्पृश्यांच्या उद्धारासाठी महाराजांचे कार्यकर्ते झाले. महाराजांच्या निधनानंतर कोल्हापूर परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अस्पृश्य निवारणाच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले. आणि विशेष महाराजांच्या निधनानंतर काही वर्षांनी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी त्यांनी एक मंडळ स्थापन केलं आणि त्या मार्फत कोल्हापुरात शाहू महाराजांचे एक स्मारक उभारले हे स्मारक देशातील महाराजांचे पहिले स्मारक आहे आणि तेही महार समाजाने उभारलेले.
या सर्व आठवणीचा एक भाग म्हणून कोल्हापूर येथील चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी गंगाधर कांबळे यांचे हॉटेल ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी एक स्मृतीस्तंभ उभा केला आहे.
अभ्यासकांनी किंवा चळवळीमध्ये काम करणाऱ्यांनी ही कडी पूर्ण करण्याकरिता कोल्हापूरला जाऊन शाहू पॅलेस,घोडे बांधण्याची जागा, पाण्याचा हौद,सत्यसुधारक हॉटेल आणि गंगाधर कांबळे यांनी उभं केलेले शाहू महाराजांच पाहिले स्मारक असे सिक्वेन्सली अभ्यासले पाहिजे.
मी आणि माझे मित्र प्रा.डॉ. सुरेश शेळके सपत्नीक त्या ठिकाणी गेलो,गंगाधर कांबळे यांच्या कार्याला त्यांच्या स्मृतींना अभिवादन केल आणि त्या जागेवर चहा घेऊन परत निघालो.
🙏🙏

संदर्भ ग्रंथ:
राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, संपादक
डॉ.जयसिंगराव पवार
महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी.

प्रा.डॉ. भीमराव खाडे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!