
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच जाहीरपणे अजित पवार व त्यांच्या समर्थकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. शरद पवारांवरील टीका एक-दोनदा ऐकूण घेईन. पण त्यानंतर तुम्हाला असा करारा जबाब मिळेल की, मतदार संघात फिरणेही अवघड होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
बायकांच्या नादी लागू नका. एक वकील पवारांना ‘तो शरद पवार’ असे म्हणाला. तू आज वकिली कर, आज ना उद्या तुझा करेक्ट कार्यक्रम केला नाही, तर मी शरद पवारांची पोरगी म्हणून नाव सांगणार नाही, असेही सुप्रिया यावेळी म्हणाल्या.
सुप्रिया सुळे सोलापूरमध्ये बोलताना म्हणाल्या की, येथे एकच हिरो आहे. दुसरे काहीच कामाचे नाहीत. स्वतःच्या मतदार संघात काय होईल हे सांगता येत नाही. ते फक्त पवारांवर डाफरून स्वतःचे महत्त्व निर्माण करत आहेत. वयाने मोठे आहात म्हणून आम्ही तुमचा मान ठेवतोय. गुण्यागोविंदाने राहा. शरद पवारांवर टीका करू नका. आम्ही तुमचे एक, दोन व तीनदा ऐकूण घेवू. पण त्यानंतर करारा जबाब मिळेल की, तुम्हाला मतदार संघातही फिरणेही अवघड होईल.
मी स्वाभिमानी मुलगी आहे. माझे कुटुंब केवळ तुम्ही सगळे आहात. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर कुटुंब आहे. ही प्रेमाची नाती आहेत. उभे आयुष्य कार्यकर्त्यांनी शरद पवारांवर प्रेम केले. अनेकांना उमेदवारी मिळाली नाही तरी विश्वास, प्रेम, ठेवून त्यांनी आयुष्यभर राजकारण केले. शरद पवारांना चौफेर प्रेम मिळाले. हे प्रेम कंत्राटी नव्हते. तर पर्मनंट आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
2024 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. अदृश्य शक्तींनी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी या 4 मराठी माणसांवर अन्याय केला. नितीन गडकरी यांचे अधिकार काढले. फडणवीसांना 10 वरून अडीचवर आणले. शरद पवारांना हुकुमशाह म्हणाले, पक्ष, चिन्ह काढून घेतले. तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणालाही NCP कुणाची असे विचारले तर ती शरद पवारांचीच आहे असे उत्तर मिळेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत