एपीआय माळाळे आत्महत्या प्रकरणाची करा ‘सीआयडी’ चौकशी.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे आनंद माळाळे यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करून दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी माळाळे यांच्या कुटुंबीयांसह समाजबांधवांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
धाराशिव शहरातील भीमनगर येथील रहिवाशी असलेले आनंद प्रकाश माळाळे हे मागील २५ वर्षांपासून पोलीस दलात होते. माळाळे हे आपल्या कुटुंबीयांसह सोलापूर येथे वास्तव्यास होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांची नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बदली झाली होती. मात्र वरिष्ठांकडून • त्यांना मदत मिळाली नाही. त्यांना – तपासासाठी अनेक गुन्हे देण्यात आले होते. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असणारे व मुदतीत दोषारोप पाठविणे – आवश्यक असणाऱ्या अनेक गुन्ह्यांचा तपास त्यांना देवून वेळेची मर्यादा घालून देण्यात आली. वरिष्ठांनी विनाकारण जाणीवपूर्वक व हेतुपूर्वक जातीय द्वेष मनात ठेवून त्यांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस दिली असे आरोप नातेवाईकांनी केले आहेत.
माळाळे हे मागील सहा महिन्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या मानसिक त्रासामुळे त्रस्त होते. एक महिन्यापूर्वी माळाळे यांचा अपघात झाल्याने ते वैद्यकीय रजेवर होते. या काळात वरिष्ठांनी वेळोवेळी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी माळाळे यांच्यावर दबाव आणला. यातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी पहाटे सोलापूर येथील राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. असा आरोप देखील करण्यात आला आहे. याप्रकरणी आनंद माळाळे यांच्या पत्नी किंवा मुलगा यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून पोलीस उपाधीक्षक हानपुडे- पाटील, पोलीस निरीक्षक नरूटे, श्री. कासेकर व इतर दोष अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत