महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

एका माजलेल्या आणि भ्रष्ट सिस्टिमच्या काळात मरणाची काही किंमत नाही..

शंभरेक लोकांना चिरडणारं महाकाय होर्डिंग उचलण्याचं काम सुरू आहे, चिरडलेल्यांपैकी चौदा जण मरण पावले. बाकी जखमी झालेत. जे मेले, त्यांच्या मरणाची काही किंमत नाही, कशी असणार, किडे मुंगी आपण. जे मेले त्यांचे नशीब वाईट की एका माजलेल्या आणि भ्रष्ट सिस्टिमच्या काळात ते जन्माला आले.

काल तिथे किरिट सोमैय्या कॅमेरा घेऊन गेले. कुणाचा भ्रष्टाचार बाहेर काढायचाय आता? की त्यालाही पक्षांतर करायला लावायचंय? तुम्हाला वाईट वाटत असेल तर काही गोष्टी करा.

दिलीप पासवानच्या घरी जा. तो तीस वर्षांचा होता. बीएआरसीतलं काम संपवून भांडूपला घरी जात होता. त्याच्या गाडीत त्याचा ड्रायव्हर आणि असिस्टंट होते. पेट्रोल भरायला पंपावर गेला होता. बाकीचे दोघं वाचले, तो गेला. रात्री अडीचला त्याची बॉडी बाहेर काढली. त्याला एक पाच वर्षांची, एक सात वर्षांची मुलगी आहे. चार महिन्याचा एक मुलगा पण आहे त्याला. त्यांना भेटा.

सचिन यादवच्या घरी जा. तो तेवीस वर्षांचा होता. पेट्रोल पंपावर कामाला होता. त्याचं काम करत होता, तेंव्हा होर्डिंग पडलं डोक्यावर. त्याला तीन महिन्याचं बाळ आहे.

शाळांना उन्हाळ्याची सुटी लागली म्हणून मुलाला गावी नेण्यासाठी चंद्रमणी प्रजापतीने तिकिट काढले होते. त्याच्या गावाकडच्या मुलीला बाबा घरी येणार म्हणून खूप आनंद झाला होता, आता त्याच्या पुतण्याला सांगावे लागले, काका मेला म्हणून.

घरी गरिबी म्हणून भरत राठोडने दहावीनंतर शिक्षण सोडले आणि तो कामाला लागला. डिलिव्हरी करून कंपनीला परत जाताना तो पेट्रोल भरायला पंपावर गेला, बाईकवर पाऊस लागायला लागला म्हणून तिथेच थांबला. त्याची आई करोनाने गेली, त्याच्या आजारी बापाला दोन दिवसांपूर्वीच राजावाडीतून घरी आणला भरतने. आता तोच गेला.

मोहम्मद अक्रम रिक्षात गॅस भरायला गेला. तोही असाच गेला.

ठाण्याच्या पूर्णेश जाधव टुरिस्ट ड्रायव्हर होते, सीएनजी भरायला जायच्या आधीच घरी बायकोला फोन करुन मुलांची चौकशी केली त्यांनी, लवकरच घरी येतोय हे ही सांगितले.

धनेश चव्हाण आणि सूरज चव्हाण हे तर बाप लेक. मित्राच्या बशीर अहमदच्या रिक्षातून जात होते, सगळेच संपले.

बाकी नावं माहित नाही, पण कहाण्या त्याच. पेट्रोल भरायला गेले, आडोश्याला गेले आणि मेले.

जे वाचले, ते वाचवायला आजूबाजूचे लोक धावले. त्यात एक निषाद इंद्रकुमार ड्रायव्हर होता.

कुणी स्वप्निल होता हे नशीब. स्वप्निल खुपते जेंव्हा होर्डिंगच्या खालून बाहेर आला कसाबसा, तेंव्हा त्याने स्वतःची पर्वा न करता अजून चार जणांना बाहेर काढले. त्यात एक लहान मुलगी होती, एक बाई होती.

सय्यद अर्शद गेला होता त्याचे वडील सय्यद हुसैनना शोधायला कारण त्यांना पंपावर ठेवून तो पुढे गेला होता, पण वडलांना शोधताना त्याने सहा जणांना बाहेर काढलं, त्यातला एक मृतदेह होता.

हे न वाचलेले, वाचलेले, वाचवाणारे सगळे सामान्य आहेत. फारसे पैसे नाहीत त्यांच्याकडे, ना तर राजकारणात जायला, ना ईडी बोलवायला. ना प्रचार करायला. यांची काही किंमत नाही. यांना काही किंमत नाही. यांना कुठली पार्टी नाही.
प्रकाश बाबुराव वाणी, शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक, घाटकोपर पूर्व विधानसभा उप विभाग प्रमुख, राजावाडी रुग्णालयातील दक्षता कमिटी सदस्य,

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!