न्यायालयाच्या कार्यक्रमात पूजा-पाठ नको, त्यापेक्षा संविधानाचा आदर करावा-सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. ओका.

पुणे ता.६:सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अभय ओका यांनी वकील आणि न्यायाधीशांना पूजाअर्चा टाळण्याचा सल्ला दिला आहे. न्यायालयीन कामकाज करणाऱ्या लोकांनी कोणत्याही कामाची सुरुवात राज्यघटनेच्या प्रतीसमोर नतमस्तक होऊन केली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. पिंपरी-चिंचवड येथील नवीन न्यायालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभात न्यायमूर्ती ओका यांनी हे वक्तव्य केलं.
न्यायमूर्ती ओका म्हणाले की, “यावर्षी 26 नोव्हेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा स्वीकार करून आपण 75 वर्षे पूर्ण करणार आहोत. मला नेहमी असे वाटते की आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत दोन अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत, एक धर्मनिरपेक्ष आणि दुसरा लोकशाही. सेक्युलॅरिझम म्हणजे सर्व धर्मांची समानता, असे काही लोक म्हणतील. मला नेहमीच असे वाटते की न्यायव्यवस्थेचा गाभा हा संविधान आहे.”
न्यायमूर्ती ओका म्हणाले की, “म्हणूनच कधी-कधी न्यायाधीशांनाही लोकांना अप्रिय वाटणाऱ्या गोष्टी बोलाव्या लागतात. आता न्यायव्यवस्थेशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात पूजा करणे किंवा दिवे लावणे यासारखे विधी थांबवले पाहिजेत. त्याऐवजी कोणताही कार्यक्रम सुरू करण्यासाठी आपण संविधानाची प्रस्तावना पाळली पाहिजे आणि त्याच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे.”
न्यायमूर्ती ओका पुढे म्हणाले की, “आपल्याला ही नवीन गोष्ट सुरू करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या संविधानाचा आणि त्याच्या मूल्यांचा आदर करता येईल. माझ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कार्यकाळात मी अशा धार्मिक विधींना आळा घालण्याचा प्रयत्न केला, पण मला ते पूर्णपणे थांबवता आले नाही. असं असलं तरी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आता आपल्याला धर्मनिरपेक्ष या मूल्याचं संवर्धन करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. त्यामुळे ती आपण गमावता कामा नये.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत