राष्ट्रपती के आर नारायणन दीक्षाभूमीवर येतात तेंव्हा . !

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती के आर नारायणन हे राष्ट्रपती म्हणून स्तुपाच्या लोकार्पणासाठी दीक्षाभूमीवर आलेले आहेत. तो दिवस होता … १८ डिसेंबर २००१ ! ते भारताचे दहावे राष्ट्रपती होते. ते भारताचे पहिले दलित राष्ट्रपती अशीही ओळख आहे. नारायणन यांनी उपराष्ट्रपती व राष्ट्रपती दोन्हीही पदे भूषविली आहेत. ते मूळचे केरळचे होते. नारायणन यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ १९९७ ते २००२ असा आहे. त्यांचा उपराष्ट्रपती व राष्ट्रपती दोन्हींचा कार्यकाळ दखलनीय राहीला. ते १९९२ ते १९९७ उपराष्ट्रपती होते.
स्तुप लोकार्पण एव्हढ्याचसाठी राष्ट्रपती नारायणन नागपुरला आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी उषा नारायणन याही होत्या. अत्यंत प्रसन्न वातावरणात हा सोहळा पार पडला. ती दुपार ४ ची वेळ होती. स्तुपाशेजारील खुल्या प्रांगणात लोकार्पण पार पडले. यावेळी राष्ट्रपतींनी केलेले भाषण अविस्मरणीय व ऐतिहासिक होते. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष दादासाहेब गवई हे होते. भाषणात राष्ट्रपती नारायणन म्हणाले, माझे बालपण केरळचे आहे. अर्थात त्रावणकोरला. तिथेच प्राथमिक शिक्षा झाली. तरुण वयात आम्हा मित्रमंडळीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप आकर्षण असायचे. बाबासाहेबांच्या विद्वत्तेने आणि दलित उद्धाराच्या कार्याने आम्ही भारावले असू. आमच्यातील प्रत्येकाला तेव्हा वाटे, ते कसे असतील? कसे दिसत असतील ? त्यांना भेटावे का ? कसे भेटता येईल ? या अशाच उत्कंठा काळात मला दिल्लीचे बोलावणे आले. ते नोकरी मुलाखतीचे होते. तेव्हा बाबासाहेब केंद्रात मंत्री होते. मी आनंदलो. कामही होईल. बाबासाहेबांची भेट घेता येईल. हे, ते करून मी त्यांचा टेलिफोन नंबर मिळविलाच ! पूढे राष्ट्रपती म्हणाले, दिल्लीला आलो. तरुण होतो. दिल्लीची ती ९ ची सकाळ होती. पब्लिक बुथ वरुन बाबासाहेबांना फोन केला. बाबासाहेब बोलत होते. मला विश्वास होईना ! पण ते खरे होते. मी सांगितले. बाबासाहेब म्हणाले, ये तू. काळजी करु नकोस. पण तुला माझे निवास शोधायला अडचण येईल. तिथेच थांब. तो पत्ता दे. थोड्या वेळाने या नंबरची गाडी तिथे येईल. तीत बसून ये. नंतर बोलू. मी पत्ता दिला. बुथशेजारी उभा राहीलो. थोड्यावेळाने ती गाडी आली. मी ओळखली. ड्रायव्हरशी बोललो. आरामात निवासात पोहचलो. बाबासाहेब बसलेले होते. माझी विचारपूस केली. कर्मचाऱ्याला सूचना दिल्या. माझी रहायची, जेवायची सोय झाली. मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. भाषणात राष्ट्रपती सांगत होते. ते पूढे म्हणाले, उपकृततेत मी भारावून गेलो. भारावून होतो. दोन दिवस याच भावनेत होतो. जींवंततेत एका महापुरुषासोबत मी आहे हा अलौकिक आनंद जगत होतो ! सभेत हजर असलेले आम्हीही भारावून होतो. सभेला मोठी उपस्थिती होती. निवृत्त कुलगुरू डॉ मधुसूदन चांसरकर, संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पंकज चांदे व मी आम्ही सोबतच बसलेले होतो. एव्हाना सभा संपली.
निघतांना डॉ चांसरकर म्हणाले, राष्ट्रपतींचे आजचे हे भाषण, पाठ्यपुस्तकाचा पाठ व्हायला हवे !
-रणजित मेश्राम
(आज २७ आक्टोबर, माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांचा जन्मदिन यानिमित्ताने आठवण)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत