पावसामूळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना दाखविण्यात आले काळे झेंडे

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येवला मतदारसंघात आलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. येवला, निफाड तालुक्यातील काही ठिकाणी भुजबळ यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी झाली. काळे झेंडे दाखवून चले जावच्या घोषणा दिल्या गेल्या. मनमाड चौफुलीवर मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ३५ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. येवला तालुक्यालाही फटका बसला. शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी भुजबळ हे आपल्या येवला मतदारसंघात आले होते. मागील काही दिवसांपासून सकल मराठा समाजाचे मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यात वाकयुध्द होत आहे. त्याचे पडसाद या पाहणी दौऱ्यात आंदोलनातून उमटले. सोमठाणे आणि कोटमगाव येथे मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर मराठा आंदोलक रस्त्याकडे पाठ करून बसले होते. काळे झेंडे दाखवत त्यांनी भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
विंचूर चौफुलीवर मराठा आंदोलकांनी ठिय्या दिला होता. सोमठाणे गावात नुकसानीची पाहणी भुजबळ करणार होते, परंतु विरोधामुळे त्यांना या गावात जाता आले नाही. या सर्व घटनाक्रमावर राजकारण्यांना काळे झेंडे दाखविणे काही विशेष नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत