राधेश्याम मोपलवार यांंनी दाखविली आगामी निवडणूक लढवण्याची तयारी

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. तत्पूर्वी त्यांचे नाव हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार म्हणून चर्चेत येत असताना या पक्षाच्या नेत्यांनी आदेश दिला, तर निवडणूक लढविण्याची तयारी आणि सिद्धता मोपलवार यांनी दाखविल्याचे वृत्त आहे.
हिंगोली लोकसभा क्षेत्रातील हदगाव तालुक्याचे रहिवासी असलेल्या मोपलवार यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रयत्न भाजप-संघ परिवारातील काही हितचिंतकांकडून झाला होता, पण नंतर त्यांचे नाव चर्चेत आले नाही. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम त्यांच्या माध्यमातून गतिमान करण्याचे फडणवीस यांनी निश्चित केले होते. त्यामुळे त्यांनी मोपलवार यांना निवडणूक रिंगणात आणले नाही.
मराठवाड्यातील लातूर-नांदेड आणि हिंगोली हे तीन एकमेकांशी जोडलेले लोकसभा मतदारसंघ भाजप आणि शिवसेना-शिंदे गट यांच्या ताब्यात असून, आगामी निवडणुकीत या तीनही जागा कायम राखण्याकडे भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे.
सन २०१९ च्या निवडणुकीत हिंगोलीची जागा शिवसेनेने लढविली. तेथे या पक्षाकडून हेमंत पाटील खासदार झाले. गतवर्षी या पक्षातील फुटीनंतर खासदार पाटील शिंदे गटात सामील झाले. ही जागा शिवसेनेची असली, तरी मोपलवार यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित होत असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यास विरोध होण्याची शक्यता नाही. कारण शिंदे आणि मोपलवार यांचेही जवळचे संबंध असून, मोपलवार यांना उमेदवारी दिल्यास भाजपच्या नांदेडमधील उमेदवाराला बळ मिळू शकते, अशी भाजप नेत्यांची अटकळ आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत