मिरज पंचायत समितीचा विस्ताराधिकारी निलंबित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान पाडण्याच्या वादग्रस्त प्रकरणात बेडग (ता. मिरज) येथील ग्रामसेवक, सरपंच यांना योग्य मार्गदर्शन केले नाही. तसेच जिल्हा परिषदेच्या नोटिसीला योग्य उत्तर दिले नाही, याबद्दल मिरजेचे विस्ताराधिकारी सदाशिव मगदूम यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी निलंबनाची कारवाई केली. प्रभारी गटविकास अधिकारी दिनकर खरात यांना नोटीस बजावण्यात आली. बेडगमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिलेली स्वागत कमान अनधिकृत ठरवून पाडण्यात आली. त्यामुळे गावात वाद निर्माण झाला. आंबेडकरी समाजाने मुंबईपर्यंत लाँग मार्च काढला. प्रशासकीय यंत्रणेची चूक असल्याचा आरोप करत बौद्ध समाजाने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने बेडगचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बी. एल. पाटील, मनोहर धेंडे यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर आता विस्ताराधिकारी सदाशिव मगदूम यांच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी प्रभारी गटविकास अधिकारी खरात यांनाही नोटीस दिली होती. त्यांच्याकडून नोटिसीचा खुलासा आला असून पुढील कारवाईबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे धोडमिसे यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत