पगार तीन कोटी; कमिशन एक कोटी!

यवतमाळ : कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणारा भरमसाट खर्च आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेतला. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीने सरकार तिजोरीत काटकसर होण्यापेक्षा कर्मचारी पुरविणाऱ्या एजन्सीच मालामाल होत आहेत. रोजगार हमी योजनेत कंत्राटावर नेमलेल्या १२६६ कनिष्ठ अभियंत्यांच्या पगारातून ही बाब चव्हाट्यावर आली. या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारापोटी राज्य शासनाने तीन कोटी ५० लाख रुपये अदा केले. मात्र, त्यापोटी एजन्सीला एका महिन्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचे चार्जेस अदा केले.
विविध विभागांमध्ये कंत्राटी मनुष्यबळ पुरविण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी जीआर जारी करून शासनाने नऊ एजन्सी नेमल्या. त्यापैकी मे. एस. टू. इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीकरिता कंत्राटी कर्मचारी पुरविण्याचे काम देण्यात आले. त्यांच्या माध्यमातून रोहयोमध्ये १२६६ कनिष्ठ अभियंते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कंत्राटावर काम करीत आहेत. या अभियंत्यांचे ऑगस्टचे मानधन अदा करण्यासाठी नियोजन विभागाने (रोहयो) १५ सप्टेंबर रोजी नागपूर येथील रोहयो आयुक्तांकडे निधी वळता केला. निधीसंदर्भातील पत्रानुसार संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना एका महिन्याच्या पगारासाठी तीन कोटी ५० लाख ६३ हजार ४७२ रुपये अदा केले गेले, तर एजन्सी चार्जेस’ म्हणून संबंधित कंपनीला ८३ लाख ६९ हजार १९२३ रुपये अदा केले गेले.
शासन निर्णयानुसार एकूण रकमेपैकी ८३ टक्के रक्कम मनुष्यबळाच्या मानधनासाठी त्यांच्या खात्यात दिली जाणार आहे. तर १६ टक्के रक्कम एजन्सी चार्जेससाठी दिली जाणार आहे. तसेच एक टक्का रक्कम कामगार सेस म्हणून कपात केली जाणार आहे. शिवाय शासनाने वर्ग केलेल्या संपूर्ण रकमेतून व्यवसाय करदेखील कापला जाणार आहे. विशेष म्हणजे, शासनाकडून या देयकात खर्च होणाऱ्या संपूर्ण रकमेवर १८ टक्के जीएसटीही जाणार आहे.
एकीकडे पगारावरील खर्च कमी करण्यासाठी कंत्राटी भरती करण्यात आली. मात्र, आऊटसोर्सिंगद्वारे हे कर्मचारी पुरविणाऱ्या कंपनीलाच चार्जेस म्हणून कोट्यवधी रुपये मिळणार असल्याची बाब यातून स्पष्ट होत आहे विशेष म्हणजे रोहयोमध्ये नेमलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना मासिक मानधन म्हणून केवळ ३२ हजार २०० रुपये मिळत आहेत, तर कंपनीला एकाच महिन्यात ८३ लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत