चेतना महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीनसंविधान गौरव वक्तृत्व स्पर्धा संपन्न !

मुंबई गुरुवार
दि. ३० नोव्हेंबर : बांद्रा, मुंबई स्थित चेतना महाविद्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन संविधान गौरव वक्तृत्व स्पर्धेत कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयाचा कु. यश रवींद्र पाटील याने पहिला क्रमांक पटकावून प्रतिष्ठेचा फिरता करंडक जिंकला. तर पनवेलच्या एम पी ए एस सी महाविद्यालयाच्या कु. पंकज पंढरीनाथ पांडुले यांने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयाची कु. मानसी मंगेश शिंदे हिला मिळाले आहे. तर भिवंडीच्या बी एन एन महाविद्यालयाची कु. प्रणिता धनाजी चौगुले व ठाण्याच्या बी एन बांदोडकर महाविद्यालयाची कु. श्रावणी दीपक पालकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली आहेत.

१. भारतीय प्रसारमाध्यमांची भूमिका लोकशाहीला पोषक आहे का ? २. जातीनिहाय जनगणना व सामाजिक न्याय ३. कल्याणकारी राज्य संकल्पना व शिक्षणाचे खासगीकरण या आजच्या ज्वलंत विषयांवर मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील तरुणाईची मते समजून घेण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद होता.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी सदस्य श्री. उदय नरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व स्तंभलेखक ॲड. धम्मकिरण चन्ने व बेस्टचे सेवानिवृत्त अधिकारी इंजि. शरद गायकवाड यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर, चेतना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत भगत व प्रा. गिरीश साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी या स्पर्धेची सुरुवात झाली. अध्यासनाचे कोषाध्यक्ष प्रा. डॉ. कैलाश लांडगे यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. डॉ. ज्योती पवार यांनी सूत्रसंचालन केले.
संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे उपाध्यक्ष प्रा. चंद्रकांत चिकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यासनाच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली. तर चेतना महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या हार्दिक सहकार्याने उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे आभार
प्रदर्शन अध्यासनाचे सचिव प्रा. किरण राजभोज यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत