देशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बटेंगे तो कटेंगे वाल्यांना विचारा सर्व गोष्टीला मुसलमानच जबाबदार आहेत का ?

बोगस आणि बकवास भाकडकथा रचून लोकांना मूर्ख बनवणारे या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे देऊ शकतील का?

देवधर्माच्या आड दडून समाजाला कुठवर लुटायचे, फसवायचे? त्यांचे मानसिक, आर्थिक, प्रसंगी शारीरिक शोषणही कुठवर करायचे? रोज नव्याचा शोध घेणाऱ्या जगाने ही हरामखोरी उघडी पाडली आहे. अशा षडयंत्राच्या जोरावर समाजावर सत्ता गाजवणाऱ्या लोकांची मुस्काडं विज्ञानाने फोडली आहेत. तरीही त्यांचा तोच तोच खेळ सुरू आहे.

१२ व्या व १३ व्या शतकाआधी म्हणजेच मुसलमान भारतात यायच्या आधी भारतातील बहुजन अर्थात एससी, एसटी, व्हीजे, एनटी, ओबीसी म्हणजे माळी, तेली, कुणबी, मराठा आणि इतर अठरापगड तथाकथित जातींमध्ये विभागलेल्यांचा शत्रू कोण होता?

मुसलमान यायच्या आधीचा इतिहास पाच हजार वर्षांचा आहे. आपला बहुजन राजा हिरणाक्ष, हिरण्यकश्यपू, बळीराजा, महात्मा चार्वाक, सिद्धार्थ गौतम, वर्धमान महावीर यांचा संघर्ष कोणा विरुद्ध होता?

जगाला शांती आणि समतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध भिक्खूंच्या कत्तली करून, बौद्ध विहारे उद्ध्वस्त करणारे मुसलमान होते का?

हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था मुसलमानांनी निर्माण केली आहे का?

कुणबी-मराठ्यांपासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंतच्या अर्थात, हिंदूंच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या धर्मग्रंथांनुसार शूद्रांपासून ते अति शूद्रांपर्यंतच्या अठरापगड जातींतील लोकांच्या आणि समस्त स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी घालून शतकानुशतके त्यांचा सर्वांगीण विकास रोखून धरणारे मुसलमान होते का?

चक्रधर, बसवेश्वर, नामदेव, ज्ञानेश्वर, कबीर, रवीदास, तुकाराम यांसारख्या संत-महात्म्यांचा अतोनात छळ करून आणि त्यांच्या हत्या करून त्यांच्यापैकी कुणी जिवंत समाधी घेतली, तर कुणी सदेह वैकुंठाला गेले असल्या थापा मारणारे मुसलमान होते का?

ज्या संत नामदेवांचे महाराष्ट्रातून पंजाबमध्ये – ‘गुरुग्रंथसाहेबा’मध्ये साठ-बासष्ट अभंग नोंदवले गेले, ते संत नामदेव जेव्हा महाराष्ट्रातील एका देवळापुढे कीर्तन करीत असतात, तेव्हा शूद्राला देवळापुढे कीर्तन करता येणार नाही, देवळाच्या पाठीमागे जाऊन तू कीर्तन कर अशी ताकीद देणारे आणि त्यांना देवळासमोरून हुसकावून लावणारे मुसलमान होते का?

नीतीनं वागणं हा खरा धर्म आहे. माणूसकीनं वागणं हा खरा धर्म आहे. रंजल्या-गांजल्या लोकांना जवळ करणं हा धर्म आहे, त्यामध्ये परमेश्वर आहे, त्यामध्ये साधुत्व आहे. इतका नैतिक धर्म सांगणाऱ्या, धर्माविषयी काहीतरी चांगलं मांडणाऱ्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून तुकोबारायांची हत्या करणारे आणि ते सदेह वैकुंठाला गेल्याची आवई उठविणारे मुसलमान होते का?

शूद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मुसलमानांनी विरोध केला होता का?

छत्रपती शिवरायांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा मुसलमान होता का?

छत्रपती शंभुराजांचे विरोधात एकदा नव्हे, तर अनेक वेळा कपट-कारस्थान रचून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कुटिल डाव आखणारे मुसलमान होते का?

छत्रपती शिवराय आणि शंभुराजांवर विषप्रयोग करणारे मुसलमान होते का?

स्त्रिया आणि अठरापगड जातींमध्ये विखुरलेल्या अलुतेदार-बलुतेदार बहुजनांच्या सर्व प्रकारच्या दुःखाचे, दारिद्र्याचे मूळ कारण शिक्षणाचा अभाव असल्याचे जाणून शिक्षण सर्वसामान्य लोकांच्या दारापर्यंत पोचावे यासाठी जिवाचे रान करणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुलेंना विरोध करणारे आणि त्यांची हत्या करण्यासाठी त्यांच्यावर मारेकरी पाठवणारे मुसलमान होते का?

बहुजनांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या पहिल्या शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंवर शेण, दगड, चिखलमाती फेकून त्यांना छळणारे मुसलमान होते का?

नोकऱ्यांमध्ये असलेली ब्राह्मणांची मक्तेदारी मोडीत काढून स्वतःच्या राज्यात बहुजनांना सर्वप्रथम नोकऱ्यांची संधी देणारे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांची बदनामी करणारे आणि ‘शूद्रांचा राजा’ म्हणून छत्रपती शाहू महाराजांची टिंगलटवाळी करणारे मुसलमान होते का?

कथा-कादंबऱ्या, भाकडकथा, नाटक-चित्रपट, छद्मी इतिहास यांच्या माध्यमातून राजमाता मॉसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय आणि शंभू राजांचे हेतुपुरस्सर चारित्र्यहनन करणारे आणि त्यांची बदनामी करणारे मुसलमान होते का? आहेत का?

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी, समतावादी चळवळीला विरोध करणारे आणि त्यांची टिंगलटवाळी करणारे, त्यांना छळणारे मुसलमान होते का?

बहुजन एससी, एसटी व ओबीसी व मराठ्यांच्या न्याय्य हक्कांना आणि त्यांच्या आरक्षणाला विरोध करणारे मुसलमान आहेत का?

ओबीसींच्या जनगणनेला मुसलमान विरोध करतात का?

न्यायालय, मंत्रालय, सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग, तसेच राज्य व केंद्रीय प्रशासनाच्या इतर विविध विभागांतील बहुजनांच्या अर्थात एससी, एसटी, ओबीसी, मराठ्यांच्या वाट्याला येणाऱ्या न्यायाधीश, राजदूत, सचिव दर्जाच्या अति उच्चपदस्थ जागा मुसलमान बळकावून बसले आहेत का?

देशातील अठरापगड जातींमध्ये विभागलेल्या बहुजन शेतकरी-शेतमजूर, कामगारांचे शोषण करणारे मुसलमान आहेत का?

असे बरेच प्रश्न विचारता येऊ शकतात. परंतु, सुशिक्षित आणि सद्सद्विवेकबुद्धी असणारे लोक या सगळ्या प्रश्नांची उत्तरे न विचारता सध्या देशात धार्मिक उन्माद निर्माण करणाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. सध्या अशा जातीवादी, खुनशी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती देशाची सूत्रे एकवटली आहेत. परिणामी, देशाचा विकास थांबून देश किमान शंभर वर्षे मागे गेला आहे. हे सर्व पाहता शेवटी या देशाचे पुढे काय होणार असा प्रश्न किमान बुद्धिमान व्यक्तींना ज्या दिवशी पडेल आणि ते वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ज्या दिवशी विचारणे सुरू करतील, ज्या दिवशी ते राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे पाहतील त्या दिवशी सभोवतालचे सत्य त्यांना दिसेल. तोच परिवर्तनाचा दिवस समजावा…!🙏🏻

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!