केरळ मध्ये निपाह व्हायरस चे मृत्यू.

केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यामध्ये निपाह विषाणूमुळे दोन रुग्णांचा मृत्यूझाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. त्यातील पहिल्या रुग्णाचा ३० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. याच रुग्णाच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्यांवरही सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या उपचार सुरू असलेला पहिला रुग्ण नऊ वर्षांचा; तर दुसरा रुग्ण २४ वर्षांचा आहे. या घटनेनंतर केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी मंगळवारी (१२ सप्टेंबर) एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत कोझिकोडे येथील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, हा विषाणू काय आहे? त्याचा प्रसार कसा होतो? तो किती विघातक आहे? याची उत्तरं जाणून घेऊ…
निपाह विषाणूच्या संसर्गामुळे दोघांचा मृत्यू झाल्यामुळे केंद्र सरकारनेही खबरदारी म्हणून कोझिकोडे येथे केंद्राचे पथक पाठवले आहे. हे पथक निपाह विषाणू संसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला मदत करील. निपाह विषाणूच्या संसर्गाची गती कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी आहे. मात्र, हा विषाणू कोरोना विषाणूपेक्षा जास्त संहारक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार या विषाणूमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्युदर हा ४० ते ७५ टक्के आहे.
निपाह विषाणूचा संसर्ग कसा होतो? लक्षणे काय?
निपाह हा एक झुनोटिक आजार आहे. म्हणजेच या विषाणूचा संसर्ग मानवाला संसर्गजन्य प्राणी किंवा अन्न यांच्या माध्यमातून होतो. संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्यास म्हणजेच एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीलादेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)नुसार या विषाणूच्या संसर्गामुळे ताप, डोकेदुखी, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास अडचण, उलट्या, अशी लक्षणे जाणवू लागतात. त्यासह गरगरणे, झोप येणे, मेंदूला सूज येणे अशी लक्षणेदेखील दिसू शकतात. मेंदूला सूज आल्यामुळे रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. तसेच त्याचा मृत्यूही होऊ शकतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत