वळ दावता अताही गतकाळच्या छळाचेउपयोग काय केले आम्ही निळ्या बळाचे..

वळ दावता अताही गतकाळच्या छळाचे
उपयोग काय केले आम्ही निळ्या बळाचे
आम्हा मुळी न शोभे हे लिबलिबीत जगणे
आयुष्य माणसे का जगतात गांडुळाचे
चारा कुणी शिकारी फुकटात देत नाही
वेळीच ओळखा रे हेतू छुप्या गळाचे
असतीलही सनातन मिरवायचेत कुठवर
हे ढीग साचलेले निर्ढावल्या मळाचे
ते सांगती अपेक्षा ठेवू नका फळाची
कारण नकोत त्यांना वाटेकरी फळाचे
वरच्या थरातल्यांनो गगनात झेप घ्या पण
राहू नयेत मागे बंधो कुणी तळाचे
जो अत्तदीप होतो तो तेवतो चिरंतन
आयुष्य ते कितीसे उद्दाम वादळाचे
सामर्थ्य ज्यात आहे हे विश्व तारण्याचे
ते पान हो ‘अशोका’ काषाय पिंपळाचे
: अशोक बुरबुरे ‘अशोक’, हिंगणघाट
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत