नुकसान आंबेडकर घराण्याचे की आंबेडकरी चळवळीचे ?
धम्मयान मीडिया टीम
आरोप करण्यापेक्षा स्वतः चिंतन करावे
मुंबई -डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम स्वतंत्र कामगार पक्ष आणि त्यानंतर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (शे. का. फे.) काढून वंचितांच्या हक्क, अधिकार आणि राजकीय स्वातंत्र्या साठी कामकाज करून समाजात स्वाभिमान जागृत केला व चळवळ उभी केली. त्याप्रमाणेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष, त्यानंतर भारिप बहुजन महासंघ आणि आता वंचित बहुजन आघाडी द्वारे भारतीय समाजात बौद्ध – बहुजन / अठरा पगड जातींना एकत्रित करून सोशल इंजिनियरिंग केले . भारतीय राजकारणात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. अकोल्यातून आमदार निवडुन आणले. पंचायत समित्या, जिल्हा परिषद,महानगरपालिके वर यशस्वी राजकीय झेंडा फडकवीला आहे. याला अकोला पॅटर्न म्हटलं जात आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेप्रमाणे प्रकाश आंबेडकर हे राजकारणाचे सामाजिकरण करत आहेत. त्यासाठी राजकारणात जे आजपर्यंत पुढारलेले नाहीत, ज्यांना प्रस्थापितांनी प्रतिनिधित्व दिले नाही, अशा समाज घटकातील – वंचितातील व्यक्तींना एकत्रित करीत आहेत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करीत आहेत. त्याला समाजातील तथाकथित अनेक बुद्धिजीवी,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, रिपब्लिकन गट नेते इत्यादी लोक विरोध करून प्रस्थापिताबरोबर (ज्यांनी आपणा वंचितांना कधीही प्रतिनिधित्व दिले नाही ) आघाडी करा, नाहीतर भाजपा -आर. एस. एस. सत्तेवर येईल असा खोटा प्रचार प्रसार करतात .ज्यांचे 1984 साली केवळ 2 खासदार होते, त्यांची विचारसरणी चातुर्वर्णाची आहे, त्यांनी कधीही समानतेचा पुरस्कार केला नाही, या विचारसरणीच्या विरोधात काम करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य,समता, स्वाभिमान मिळवून दिला. मात्र त्या संविधानाला मनुवाद्यांनी गोधडी म्हटले, राष्ट्र ध्वज -तिरंगाचा तीन कलर अशुभ इत्यादी म्हणून संभावना केली, त्याला अद्याप मान्यता नाही, त्यांना धर्मावरील आधारीत संविधान पाहिजे. या विचारसरणी विरोधात प्रस्थापीत काँग्रेस आणि इतर राजकारणी – पक्ष यांनी काय केले?
सन 2019 च्या निवडणुकीत वंचितची सर्वत्र हवा पसरली.
तीच्यामुळे प्रस्थापीत काँग्रेसचे सुमारे 15 उमेदवार हरले आणि वंचितचे 5 काँग्रेसमुळे हरले , आज रोजी काँग्रेस , शिवसेना व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष फुटलेले आहेत. त्यांची किती ताकद आहे ? याचा आरसा प्रकाश आंबेडकर यांनी दाखविला. त्यांना एका मागासवर्गीय – वंचित घटकाने आरसा दाखविलेले आवडले नाही, नव्हे ते अजूनही आम्ही प्रमुख /प्रस्थापित आहोत, असेच वागले . पण खरे पाहता ते त्यांच्या जातीच्या वर्णाप्रमाणे वागत व वागवत आहेत. हे महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या वागणूकी वरून स्पष्ट झालेले होते.
प्रस्थापित काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांना खरेच संविधान वाचवायचे आहे, तर मग ज्यांच्यामुळे त्यांचे उमेदवार पडले आहेत त्यांना पहिले का विचारात- आघाडीत घेतले नाही? जे प्रकाश आंबेडकर यांना व त्यांच्या स्वभावाबद्दल बोलतात त्यांच्या पाठीमागे किती लोक आहेत, त्यांचे संघटन कुठे आहे? गल्ली बोळातले पण स्वत:ला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात? त्यातील काही तर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या विरोधातील भाजपा - आर. एस. एस. कडे जाऊन त्यांचा प्रचार ही करत आहेत त्याचे काय? मग बाबासाहेब यांच्या चळवळीचे काय? त्यांच्या विचाराचे काय?किती वैयक्तिक स्वार्थ करायचा?
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबरच आणखी दोन नातू डॉ. भीमराव य. आंबेडकर व आनंदराज आंबेडकर असे तीन नातवांनी भारतीय संविधान संरक्षण अभियान देशभर राबविले आणि त्यासाठी स्वतः निवडणुकीत उभेही राहिले, परंतु त्यांना जाणीवपूर्वक हरविले गेले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बाप म्हणायचे, स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणायचे, आंदोलनात सहभागी व्हायचे, मात्र त्यांच्या नातवांना, खऱ्या वारसादारांना मत द्यायचे नाही. ते निवडून आले नाहीत तर त्यांचे वैयक्तिक काय नुकसान होणार आहे? बाबासाहेब यांचे नातू असल्याने ते मोठेच आहेत. ते समाजासाठी लढत आहेत. पण जे प्रस्थापित पक्ष आणि त्यांचे हस्तक असलेले समाजातील, चळवळीतील काही लोक जाणीवपूर्वक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवांनी इज्जत घालविली, असे बोलत आहेत. खरे पाहता इज्जत घराण्याची गेली की, चळवळीची गेली ? याचे चिंतन करावे.
डॉ भीमराव य आंबेडकर हे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दलाच्या माध्यमातून चळवळ मजबूत करत आहेत, पंजाब मध्ये एकेकाळी RPI ची सत्ता होती, आता तेथे RPI चे काहीच अस्तित्व नाही त्यामुळे रिपब्लिकनचे रिव्हायवलं करण्यासाठी ग्लोबल रिपब्लिकन पार्टीच्यावतीने स्वतः उभा राहून सुरुवात केली आहे. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया / समता सैनिक दलाचे महाराष्ट्र व देशभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वैयक्तिकपणे डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या होशियारपूर येथील निवडणूक बँक खात्यात जमा केलेले आहेत, ते सुमारे रु.20 लाख आहेत.
भाजपा -आरएसएस सत्तेत येऊ नये म्हणून वंचित बरोबर का समझोता केला नाही ? याचे काय? जसे सर्वात जुना व मोठा पक्ष काँग्रेस व नवीन राष्ट्रवादी शरद पवार यांनी स्वतः कमी जागा घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे यांना सर्वात जास्त जागा जशा दिल्या तशा वंचितला सन्मानाने का नाही दिल्या? टाळी एका हाताने वाजत नाही.
महाराष्ट्रात इंडिया आघाडी करतांना राष्ट्रवादी शरद पवार व कांग्रेसने मिळून उद्धव ठाकरेंना प्रकाश आंबेडकर यांच्या झालेल्या युती पासून दुर करून ठाकरेंना आघाडीत सामील केले. आघाडीच्या नेत्यांनी जागांविषयी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा न करता वारंवार मेडीयाद्वारे जागांचे गाजर दाखवले, आंबेडकर अनुयायांना लक्ष्य करुन चिथावले गेले. परिणामी प्रकाश आंबेडकर यांना एकटे पाडून आघाडीला आंबेडकर चळवळीची फक्त मते पाहिजे होती. त्यांना आंबेडकर जड जात होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्यामुळे वाढणाऱ्या चळवळीला बदनाम करण्याचे षडयंत्र राबविले गेले.
आताच्या निवडणुकीत सर्व स्पष्ट झाले …..की कोण कुणाला पर्याय आहे.
संविधान वाचवायचे असेल तर प्रस्थापित काँग्रेस, शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार यांनी आणि वंचित प्रकाश आंबेडकर यांनी चिंतन करून विधानसभा निवडणुक लढवावी यातच शहाणपण आहे !!!
धम्मयान मीडिया टीम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत