फडणवीसांच्या ऊर्जा विभागाची अजित पवारांकडून बैठक महावितरणचा घेतला आढावा.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा खात्याची बैठक घेतली. आपल्या समर्थक आमदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित कामाचा आढावा घेण्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी ऊर्जा खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कामे पूर्ण करण्याबाबत आदेश दिले. फडणवीस यांना अंधारात ठेवून ऊर्जा खात्याची बैठक घेण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयावर भाजपमधून (BJP) नाराजीचा सूर आहे.
अजित पवार यांनी आज मंत्रालयात माढा, करमाळा, अकोले, अहमदनगर, खेड, कोपरगाव, मोर्शी, कळवण, निफाड, वसमत, औंढा, बारामती आदी तालुक्यांमधील ‘महावितरण’शी संबंधित प्रलंबित कामांचा तसेच नवीन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार, डॉ. किरण लहामटे, देवेंद्र भुयार हे प्रत्यक्ष तर, संजय शिंदे, दिलीप मोहिते- पाटील, दिलीप बनकर, चंद्रकांत नवघरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. केवळ आपल्याच गटातील आमदारांच्या मतदारसंघातील महावितरण कंपनीशीसंबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अजित पवारांनी आजच्या बैठकीचे आयोजन केले होते. अशी बैठक घेऊन अजित पवार यांनी फडणवीस यांना धक्का दिल्याचे मानले जाते.
गेल्या महिन्यात अजित पवार यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी वॉर रूम स्थापन केला असताना अजित पवार यांनी समांतर अशी प्रोजेक्ट मॉनिटरिंग कक्ष नावाची यंत्रणा स्थापन केली आहे. यावरून झालेला वाद ताजा असताना अजित पवार यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार संबंधित भागातील उपकेंद्रांचे प्रलंबित काम पूर्ण करणे, उपकेंद्रांची क्षमतावाढ करणे आणि नवीन उपकेंद्र मंजूर करणे आदी कामे हाती घेऊन प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश अजित पवार यांनी या बैठकीत दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत