७५ व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं हुतात्म्यांना देशवासियांच्या वतीनं आदरांजली केली. ७५ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ प्रमुख पाहुणे म्हणून या सोहोळ्याला उपस्थित आहेत. नवी दिल्लीतल्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारने ६६३ आदिवासी विद्यार्थी आणि शिक्षकांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे. यामध्ये २५८ मुली, ३३१ मुले आणि ७४ शिक्षक यांचा समावेश आहे. ही सर्व मुलं केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयाच्या योजनांच्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीचे लाभार्थी आहेत. काल या मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासमवेत फोटो काढण्याची तसेच दिल्ली स्थळदर्शन करण्याची संधी मिळाली. यंदाच्या पथसंचलनात महिला शक्तीचं दर्शन घडणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली लष्कराच्या तीनही दलांची महिला पथकांचं संचलन होणार आहे. यात १६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचा ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान-छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ यंदा संचलनात सहभागी होत आहे. यवतमाळचे तुषार प्रधान आणि रोशन इंगोले यांच्या कला दिग्दर्शनात हा चित्ररथ तयार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग यात दर्शवण्यात आले आहेत. विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही यंदाच्या पथसंचलनाची प्रमुख संकल्पना आहे. समाजाच्या सर्व स्तरांतल्या सुमारे १३ हजार नागरिकांना या सोहोळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत