
पुरुषांच्या एलाईट शर्यतीत लेमी हेल यानं २ तास ७ मीनिटं आणि ५० सेकंदाची वेळ नोंदवत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावलं. आज झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत इथोपियाच्या धावपटूंनी वर्चस्व गाजवलं. हेमॅनोट अॅल्यू हा यानं दुसरा तर मितकू ताफा यानं तिसरा क्रमांक पटकावला. महिलांमध्येही इथोपियाच्याच मिन सेवो हीनं सुवर्णपदक पटकावलं, तर मुलुहब्त त्सेगा हीनं दुसरा आणि मेधिन बेजेने हीनं तिसरं स्थान पटकावलं. भारतीय स्पर्धकांमध्ये निरमाबेन ठाकोर हीनं एलिट शर्यतीत पहिलं स्थान पटकावलं. संपूर्ण गटात आठवा आलेल्या बुगाथा यानं भारतीय स्पर्धकांमध्ये २ तास १७ मीनिटं २९ सेकंदांसह पहिला क्रमांक पटकावला, तर गोपी थोनाकल यानं दुसरा आणि शेर सिंग तन्वर यानं तिसरा क्रमांक पटकावला. अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या गटात सावन बरवाल यानं १ तास ५ मिनटं ७ सेकंदांसह पहिला तर, किरण म्हात्रे यानं दुसरा आणि मोहन सैनी यानं तिसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे तीनही विजेते भारतीय लष्करात कार्यरत आहेत. महिलांच्या गटात अमरीता पटेल हीनं १ तास १९ मिनटं २० सेकंदाच्या वेळेसह पहिला, तर पूनम दिनकर हीनं दुसरा आणि कविता यादव हीनं तिसरा क्रमांक पटकावला. राज्यपाल रमेश बैस यांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मॅरेथॉन एलिट, चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटीज आणि ज्येष्ठ नागरिकांच्या शर्यतीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी देखील यावेळी उपस्थित होते. ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळची जगज्जेती पोल व्हॉल्ट पटू केटी मून ही यंदाच्या स्पर्धेची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये देशा विदेशातून सुमारे ६० हजार स्पर्धक सहभागी झाले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत