देशातील सर्वात धुके असणारे विमानतळ पुणे!

पुणे विमानतळ हे शुक्रवारी (८ डिसेंबर) सकाळी देशातील सर्वाधिक धुके असलेले विमानतळ ठरले. या खराब हवामानाचा फटका विमानसेवेला बसला. पुणे विमानतळावर येणारी विमाने अन्यत्र वळविण्यात आली, तर अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
पुणे विमानतळ परिसरात सकाळी मोठ्या प्रमाणात धुके होते. त्यामुळे सर्वसाधारण दृश्यमानता ५० मीटरवर आली. याचवेळी धावपट्टीची दृश्यमानता १५० मीटरवर आली. त्यामुळे सकाळी आठच्या सुमारास इंडिगोचे दिल्ली-पुणे हे विमान मुंबईला वळविण्यात आले. याचबरोबर विस्ताराचे दिल्ली-पुणे विमानही मुंबईला वळविण्यात आले. प्रामुख्याने दिल्लीहून येणाऱ्या विमानांना फटका बसला. दिल्लीहून येणाऱ्या सुमारे पाच विमानांना विलंब झाला. तसेच पुण्यातून विविध शहरांत जाणाऱ्या सुमारे आठ विमानांच्या उड्डाणाला विलंब झाला.
विमाने दुसरीकडे वळविण्यात आल्याची अथवा विलंब होत असल्याची माहिती विमान कंपन्यांकडून प्रवाशांना वेळेत देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. विस्तारा कंपनीने समाजमाध्यमावर या बाबत घोषणा केली. परंतु, विमानतळावरील डिजिटल माहिती फलकांवर कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, अशी तक्रार अनेक प्रवाशांनी केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत