मागासवर्ग आयोगाच्या प्रा. लक्ष्मण हाके या सदस्याचा राजीनामा.

मराठा आरक्षणासंदर्भात आयोगाचे पुण्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. कामाचा व्याप लक्षात घेता आयोगात काम करणे शक्य नसल्याचे कारण देत प्रथम प्रा. डॉ. संजीव सोनावणे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सर्व समाजांचे सर्वेक्षण करण्याच्या मागणीवरून मतभेद झाल्याने बालाजी किल्लारीकर यांनी राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ आता हाके यांनी राजीनामा दिला आहे. हाके जून २०२१ पासून आयोगाचे सदस्य होते.
आयोगाच्या बैठकीत वैचारिक मतभेदांमुळे व्यथित होऊन सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे हाके यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. आयोगाच्या अध्यक्षांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हाके यांनी राजीनाम्याची प्रत पाठवली आहे. याबाबत हाके म्हणाले, ‘‘आयोगाच्या कामकाजात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शासन-प्रशासनाचा हस्तक्षेप आहे. आयोगाने संशोधनात्मक, वस्तुस्थितीदर्शक काम होणे अपेक्षित आहे. काम करताना घटनात्मक तत्त्वे, निकष पाळले गेले पाहिजेत. प्रश्नावली तयार करून घ्यायची, हा काय प्रकार आहे? आयोगाला अशा प्रकारची स्वायतत्ता देण्यात आली आहे का?’’
ओबीसींना कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण न करता आरक्षण देण्यात आले आहे, त्यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द करावे, अशी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या खटल्यास राज्य मागासवर्ग आयोगाला पक्षकार करण्यात आले आहे. एक वर्षापूर्वी आयोगाच्या सर्व सदस्यांनी एकमताने एक शपथपत्र तयार केले आहे. ते शपथपत्र एक वर्षभरापासून प्रशासनाच्या सचिवांकडून न्यायालयात सादर करण्यात आलेले नाही. मागासवर्ग आयोगाच्या १ डिसेंबरच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता यांनी न्यायालयात शपथपत्र सादर करण्यास नकार दिला, असे सांगण्यात आले. या सर्व गोष्टी आयोगाच्या स्वायत्ततेवर घाला घालणाऱ्या आहेत. आयोग स्वायत्त असून त्याला संविधानिक अधिकार आहेत; मग महाधिवक्ता शपथपत्र दाखल करू नका, असे सांगणारे कोण? हा आयोगाच्या कामकाजात शासनाचा हस्तक्षेप आहे. यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी यांच्याबाबत अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत, असेही प्रा. हाके यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत