दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आणि बुद्ध हसला!

18 मे 1974 रोजी, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, बरोबर 51 वर्षांपूर्वी भारताने राजस्थानातील पोखरण येथे ‘पिसफूल न्यूक्लिअर डिवाईस’ची चाचणी केली. भारताने अणूबॉंब चाचणी निर्बंध करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या असल्याने ही चाचणी खुल्या वातावरणात किंवा समुद्रात करता येणे शक्य नव्हते. तसे केले असते तर भारतावर जगभरातून आर्थिक निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता होती. भारत आर्थिक कोंडीत सापडून दरीद्री झाला असता. म्हणून ही चाचणी राजस्थानातील पोखरणच्या वाळवंटात जमीनी अंतर्गत करण्याचे ठरले. त्यावेळी अमेरिका जगभरातल्या अशा हलचालीवर लक्ष ठेवत असे म्हणून ही मोहीम एवढी गुप्तपणे राबवली गेली की देशभरातील बोटावर मोजता येईल एवढ्या लोकांनाच या चाचणीची माहित होती. अखेर 18 मे 1974 च्या सकाळी 08 वाजून 05 मिनिटाला ही चाचणी यशस्वीपणे पार पडली आणि आकाशावाणीच्या दिल्ली केंद्रावरून ‘.. आणि बुद्ध हसला’ असे सांगत या चाचणीची माहिती देशभर व नंतर जगभर जाहीर करण्यात आली. अनेक वर्ष गुलामीच्या झळा सोसून नव्याने स्वतंत्र झालेला देश आपल्या रक्षणार्थ समर्थ, समृद्ध झाला होता. बलढ्या, अहंकारी सत्तांना आता घाबरण्याची किंवा त्यांच्यापुढे लाचार होण्याची आता आवश्यकता नव्हती. हे पाहून ‘बुद्ध हसला’ होता.
आज 51 वर्षानंतर आपण नेमक्या बुद्ध पौर्णिमेच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थितिचा सामना केला. या युद्धजन्य परिस्थितीत भारतीय माध्यमांनी जगभर आपले हसे करून घेतले. खोट्या, फसव्या आणि तपशीलहीन बातम्या चालवून लोकांची दिशाभूल केली. सैनिकांच्या कर्तबगारीचे श्रेय सत्तेतल्या लोकांना देत, सत्तेतल्या लोकांचे उदात्तीकरण करीत युद्धाचा उन्माद साजरा केला. तो अजूनही सुरूच आहे. एकिकडे 51 वर्षांपूर्वी एवढ्या मोठ्या देशात कुणालाही खबर न लागू देता यशस्वी अणूचाचणी घडवून आणणारे संयमी नेतृत्व आणि दुसरिकडे आज सीमेवर एक गोळी चालली तरी त्याची अतिशयोक्त बातमी करून श्रेय घ्यायला धडपडणारे उथळ नेतृत्व, असा प्रवास आपण केला आहे. बुद्ध तेव्हाही हसला होता आणि आजही हसत आहे. तेव्हा सम्यक कृतीवर तो समाधानाने हसला होता. आज सत्तेतल्यांच्या अहंकारावर, त्यांच्या बेभान व बालिश वागण्यावर तो हसतो आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा आणि हसऱ्या बुद्धाला नमन!

© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!