“संपूर्ण समाजाची जातनिहाय जनगणना केली पाहिजे” बालाजी किल्लारीकरांनी सरकारला दिला सल्ला

मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण करायचे की फक्त मराठा समाजाचे, याबाबत मतभेद झाले. सर्व समाजांचे सर्वेक्षण करण्याच्या मुद्यावर काही सदस्यांनी बाजूने, तर काही सदस्यांनी विरोधात मत मांडले. त्या वेळी अॅड. बालाजी किल्लारीकर यांनी सर्व समाजांचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा आग्रह धरला. मात्र, त्यावर एकमत न झाल्याने किल्लारीकर यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला.
या संदर्भात किल्लारीकर म्हणाले, की राज्यात सामाजिक वातावरण बिघडले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी संपूर्ण समाजाची जातनिहाय जनगणना केली पाहिजे. आपले प्रतिनिधित्व नोकरी, शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती आहे, याची माहिती सर्व समाजांना होणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजा-समाजांत निर्माण झालेले मतभेद मिटण्यासही मदत होईल. समाजाला संपूर्ण माहिती देऊन तसे जनमत बनवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. सत्य परिस्थिती समाजाला सांगितली पाहिजे. या गोष्टी लवकर घडत नसल्याने समाजा- समाजांत गैरसमज निर्माण होत आहेत.
मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे निकष अंतिम
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी करायच्या सर्वेक्षणाचे निकष शुक्रवारी अंतिम केले. त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर आणि आवश्यक निधी, मनुष्यबळाची पूर्तता केल्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले.
सर्वेक्षण करण्यासाठी आवश्यक प्रश्नावली जवळजवळ पूर्ण झाली असून, पुढील बैठकीत त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. माहिती गोळा करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याचेही राज्य सरकारला कळविण्यात आले आहे. मात्र, हे सर्वेक्षण कोणत्या पद्धतीने करायचे, त्यावरच निधी किती द्यायचा, याचा निर्णय राज्य सरकार घेईल. सर्वेक्षणासाठी किती वेळ लागेल, हे आताच सांगता येणार नाही. घरोघरी जाऊन किंवा प्रातिनिधिक (सॅम्पल) सर्वेक्षण करायचे, यावर कालमर्यादा ठरेल. याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत