एका दलित तरूणाचा मंदिर प्रवेशामुळे मारहाणीत मृत्यू

नागपूरमध्ये रामटेकमधील घटना, मुस्लीम तरुण जखमी
विवेक विश्वनाथ खोब्रागडे (२१, सीतापूर, देवलापार, ता. रामटेक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे, तर फैजान खान (पवनी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मंदिरात का आलास, अशी विचारणा करीत जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत रविवारी दलित तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मुस्लीम मित्र गंभीर जखमी झाला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक खोब्रागडे आणि त्याचा मित्र फैजान खान हे दोघे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दुचाकीने रामटेकच्या प्रसिद्ध गडमंदिरात शोभायात्रा पाहायला गेले होते. ती संपल्यानंतर परतत असताना गडमंदिर मार्गावर या दोघांना मनीष भारती, जितेंद्र गिरी, सत्येंद्र गिरी व त्यांच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी अडवले. ‘तुम्ही दलित आणि मुस्लीम असूनही येथे कशाला आले?’ असा सवाल त्यांनी केला. ‘तुम्ही गाडीला धडक दिली. त्याच्या नुकसान भरपाईपोटी पैसे द्या’ अशी मागणी करत जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. मनीषने जखमी अवस्थेतील फैजानला कुटुंबीयांना फोन करण्यास सांगितले. फैजानने भावाला फोन करून घटनास्थळावर बोलावून घेतले. मनीषने फैजलच्या भावाकडून ऑनलाइन १० हजार रुपये घेतले. त्यानंतर जखमी अवस्थेतच विवेक आणि फैजान व त्याचा भाऊ हे तिघेही घरी परत गेले. दरम्यान, विवेकचे वडील विश्वनाथ घरी आल्यावर त्यांना ही घटना समजली. त्यांनी विवेकला कामठीतील चौधरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मनीष बंडूजी भारती (३७), जितेंद्र गजेंद्र गिरी (२३) आणि सत्येंद्र गजेंद्र गिरी (२५) सर्व रा. अंबाडा वार्ड, रामटेक यांना अटक केली. अन्य आरोपी सध्या फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आशीत कांबळे हे करीत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत