ठाण्यात शनिवारी बाबुराव बागूल यांच्या साहित्याचा जागर.

वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,
पंच महाभूतांचे पाहून, विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ‘ऋचा’
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही, तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस, आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले, हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही…..
अशासारख्या अनेक विद्रोही, क्रांतिकारी कविता लिहून मराठी साहित्याच्या भवतालाला झटके देणारे कवी, कथा, कादंबरी बाबुराव बागूल हे मराठी साहित्यातील एक तळपत्या सूर्यासारखे नाव.
ज्यांच्या साहित्यातून विद्रोहाच्या चिंगाऱ्या ठाई-ठाई विखुरलेल्या आहेत ते क्रांतिकारी नाव म्हणजे बाबुराव बागूल. बागूल यांच्या ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथा संग्रहाला यावर्षी साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमिताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएन महाराष्ट्रच्या वतीने बाबुराव बागूल साहित्य विचार परिषदेचे आयोजन शनिवारी (दि. १४ ऑक्टोबर) मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या ठिकाणी करण्यात आले आहे.
या परिषदेचे उद्घाटन शे.का.प.चे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी १0.30 वा. होणार असून अध्यक्षस्थानी शिवा इंगोले असणार आहेत. या उद्घाटन सत्रात सुभाष लोमटे, कॉ. किशारे ढमाले, मधू मोहिते, त्रिशिला कांबळे आणि रवी मोरे हे प्रमुख पाहून म्हणून सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या सत्रात बाबुराव बागूल यांचा समग्र साहित्य विचार या विषयावरील चर्चासत्रात राम दुतोंडे, डॉ. प्रकाश मोगले, प्रा. वंदना महाजन, डॉ. बी. रंगराव, डॉ. अनंत राऊत सहभागी होणार आहेत तर अध्यक्षस्थानी प्रा. प्रकाश शिरसाठ हे असणार आहेत. दुपारी ४ ते ६ या सत्रात ‘बाबुराव बागूल यांची समकालिन सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्टी’ या विषयावरील चर्चेत कॉ. विश्वास उटगी, अॅड. एम. ए. पाटील, डॉ. संजय रामराजे, अरविंद सुरवाडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. तर अध्यक्षस्थानी शामदादा गायकवाड असणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत