नागपूरच्या वस्त्यांमध्ये युवकांचा हा समूह का फिरतोय?
सध्या नागपूरच्या बऱ्याच वस्त्यांमध्ये युवकांचा एक समूह फिरताना दिसत आहे. रोज सायंकाळी कुठल्या न कुठल्या वस्तीत ते दिसतात. दोन माइक चा एक पोर्टेबल स्पीकर, टु-व्हीलर घेऊन युवकांचा हा समूह रोज नागपूरच्या वेग-वेगळ्या वस्त्यांमध्ये जावून गाणी म्हणत आहे.
शिक्षा मिले यहां सब बच्चों को, ये उनका अधिकार है,
मूलभूत अधिकारों का भी संविधान ही आधार है,
जात – धर्म का भेद नहीं है, सबको न्याय समान है,
भारत का संविधान है, भारत का संविधान है,
कवि व गायक कुणाल प्रभाकर वराळे यांचे हे गीत गात नागपूर शहरात हे युवक वस्त्यावस्त्यात फिरत आहेत. गेले एक-दीड वर्ष झाले वस्तीतील हे युवक रोज आपापली कामे करून सायंकाळी फिरतांना दिसत आहेत.
फूले-आंबेडकर मिशन साठी समर्पित होवून संविधानाचे मूलभूत विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याची मनातली जिद्द, रोजचा निश्चित वेळ, अनेक महिन्यांची तयारी, पोर्टेबल स्पीकर, आपापली टु-व्हीलर घेऊन युवकांचा हा समूह रोज नागपूरच्या वेग-वेगळ्या वस्त्यामध्ये जावून संविधान व लोकजागृतीची फूले-आंबेडकरी विचारांची गाणी म्हणतात. या युवकांनी निवडलेली गाणी देखील समाजाला अपील करीत आहेत. “भारत का संविधान है”, “मांडलाय बाजार बघा मांडलाय बाजार” “शिकले सावरले माय समाजा विसरले माय” अशी अनेक गाणी ते गातात.
युवकांचा हा समूह केवळ गाणीच म्हणत नाही तर गाण्यांसोबत भारतीय राज्य घटनेचे मूलभूत अधिकार व दिशानिदेशक तत्वे देखील सोप्या शब्दांत सांगतात. ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्यक, महिला, बालक, युवक, शेतकरी, मजूर यांचे मुद्दे ते मांडतात. छोटासा व्यवसाय करून रोजच्या कमाईवर आपला घरप्रपंच चालवणारे, सामान्य दिसणाऱ्या ह्या युवकांना भारताच्या संविधानातील मूलभूत अधिकार तोंडपाठ आहेत. मूलभूत अधिकारांवर ते ज्या सफाईने बोलतात ते ऐकून स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांना व सरकारी पदांवर आसीन लोकांना देखील विचार करायला भाग पाडत आहेत. संदीप चव्हाण, अविनाश साखरकर, राहूल मडामे, संजय पंचभाई, प्रवीण अडीकणे, सुमित कोटंगले व शशांक वाघमारे हे व त्यांचे इतर मित्र दिवस रात्र मेहनत करून वस्त्यावस्त्यांत संविधान मूल्यांचा प्रचार करीत आहेत.
जिद्दीने पेटलेल्या युवकांचा हा समूह “भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन” शॉर्ट फॉर्म मध्ये BS4 हे सूत्र ध्यानात घेऊन सतत काम करत आहे. समाजातून त्याना चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. हे युवक भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन (BS4) या अभियानाअंतर्गत दिनांक 22 ऑक्टोबर 2023 नागपूर येथे होत असलेल्या संविधान प्रबोधकांच्या पथसंचलनाच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत. या करिता त्यांनी लोकवर्गणीतून काही दिवसांसाठी एक छोटा टेम्पो देखील सजवला आहे. या युवकांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.
गेल्या चार वर्षांपासून, देशभरात “भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन म्हणजेच BS4” या जन जागरूकता अभियानाअंतर्गत भारताच्या संविधानाचा संदेश लोकांपर्यंत घरोघरी घेऊन जाण्यासाठी हजारो कार्यकर्ते कार्य करीत आहेत. “BS4 महाअभियान” अंतर्गत, संविधानाचा सन्मान सुरक्षा संवर्धन करण्यासाठी देशभरात 50 हजार संविधान-प्रबोधक आणि 10 हजार लोक सामाजिक कार्यवाही समित्या (पीपल्स अॅक्शन कमिटी तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशातील 210 हून अधिक जिल्ह्यांमध्ये या मोहिमेला वेग आला आहे. या सर्व जिल्ह्यांचे 150 क्लस्टरमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. मोहिमेच्या मूळ उद्देशाचे विहंगावलोकन करण्यासाठी, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 मध्ये BS4 क्लस्टर अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सुमारे 1700 स्थानिक संस्था, 35000 हून अधिक प्रतिनिधी, सुमारे 16500 संविधान प्रबोधक आणि 1200 हून अधिक वक्ते सहभागी झाले होते.
याच BS4 अभियानाअंतर्गत दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर येथे संविधान प्रबोधकांचे पथ संचलन होवू घातले आहे. नागपूर शहरात पथसंचलनासोबतच इंदोरा मैदान, जरीपटका येथे संविधान प्रबोधकांच्या गणसभेचा कार्यक्रम देखील होणार आहे.
आपण व्हाटसअप वरुन आता या घडीला एक गोष्ट निश्चित करू शकतो. या युवकांच्या प्रयत्नांची माहिती आपल्या कुटुंब व मित्रपरिवाराला देवू शकतो. त्यानंतर हे युवक ज्या “भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन म्हणजेच BS4” अभियानात जुळले आहेत त्या संविधान जगरूकतेच्या अभियानात आपण आपल्याला जसा जमेल तसा सहभाग नोंदवू शकतो.
पीपल्स ब्रॉडकास्ट
एमएनटी न्यूज नेटवर्क इनीशीएटीव्ह
लेखक : पीएसपी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत