देश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

ग्रोक पुराण…


….सुनिल सांगळे फेसबुक

ग्रोक हे भारीच आहे. माहिती व्यवस्थित संकलित करून अक्षरशः २/४ सेकंदात ती तुमच्या समोर मांडण्याचा त्याचा वेग अचंबित करणारा आहे. जागतिक पातळीवरचे हे ऍप अगदी महाराष्ट्रातील एखाद्या खेड्याचीही माहिती (तिथल्या स्थानिक माणसालाही नसेल एवढी) सेकंदात पुरवते. काही दिवस त्याचा वापर करून पाहिला. मुख्य म्हणजे हे interactive आहे. आपल्याला माहिती कमी वाटली तर पुढे विचारत रहा, ते आत घुसून देत राहते.

अर्थात त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत. कालपासून वाघ्याच्या रायगडावरील समाधीबद्दल वाद सुरू होता. सहज ग्रोकला विचारून पाहिले की महाराष्ट्रातील धनगर समाजाला ती समाधी हटविणे का मंजूर नाही. ग्रोकने धनगर समाजाबद्दल माहिती देत सांगितले की पशुपालक समाज असल्याने त्यांना तसे वाटत असेल, किंवा छत्रपतींच्या वारशाबद्दल ते आग्रही असतील वगैरे. हे अर्थातच खरे नाही. पण माहिती देता देता ग्रोकने सांगितले की १९०६ मध्ये होळकरांनी या समाधीच्या नूतनीकरणाला ५००० रुपये दिले होते. यावर मग मी फिडबॅक दिला की आता उत्तर मिळाले. होळकर हे धनगर समाजाचे असल्याने हा विरोध आहे.

यावर या interactive ऍपने चक्क या माहितीमुळे आपल्या उत्तरातील उणीवा दूर झाल्या याबद्दल माझे आभार मानले आणि आपले सुधारित उत्तर पाठवले आणि आणखी काही माहिती असेल तर द्या असेही सांगितले. अर्थात ग्रोकसारख्या ऍपला भारतीय जातीसंस्था, जातीय अस्मिता या गोष्टी सध्याच्या बाल्यावस्थेत माहित असतील ही अपेक्षा चुकीची आहे.

पण तंत्रज्ञान काय करू शकते याचे ग्रोक हे एक विस्मयकारक उदाहरण आहे यात शंका नाही. हे गुगल सर्चपेक्षा फार वेगळे आहे. उच्च दर्जाचे ज्ञान असलेल्या एखाद्या मित्राशी गप्पा मारत मारत, अधिकाधिक कठीण प्रश्न विचारत आपले ज्ञान वाढवावे असा अनुभव ग्रोकशी संवाद साधून होतो. पण दुसरीकडे हया तंत्रज्ञानामुळे मानवी अभ्यासाला किती किंमत उरेल ही भीती आहेच. एखाद्या विषयावर अनेक वर्षे अभ्यास करून जी माहिती आपण मिळवली आहे ती अशी सेकंदात समोर फेकली जाते हे आश्चर्यकारकच नव्हे तर भितीदायकही वाटते. एखादा डॉक्टरेटचा प्रबंधही अशा प्रकारे थोडयाशा प्रयत्नांनी तयार होऊ शकेल; फक्त त्याला थोडे संस्करण लागेल.

तरीही माहिती नेटवर शोधून, ती संकलित करून समोर टाकणे वेगळे आणि सर्जनशील गोष्टी करणे वेगळे. विशेष म्हणजे ग्रोक ते ही सहज करते. उदा. अनेक वेगवेगळे विषय देऊन मी त्याला कविता करून मागितल्या आणि अशा सुंदर कविता त्याने २/४ सेकंदात समोर बनवून टाकल्या. मुद्दाम रुक्ष विषयावर कविता मागितली तर त्याबद्दलही हा विषय खूप वेगळा आहे, असे म्हणून त्यावरही मस्त कविता तयार करून दिली. हे सगळे विस्मयकारक आहे आणि पुढे काय होईल याची चिंताही वाढवणारे आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!