तुम्ही कोणत्या समूहात आहात ? – किरण माने

एरिक फ्रॉम नांवाचा महान विचारवंत होता. तो एके ठिकाणी म्हणतो, जगात दोन प्रकारची वृत्ती असलेली माणसं असतात. सतत दुसऱ्याकडनं काहीतरी घेणारी एक वृत्ती असते. अत्यंत मतलबी. समोरच्याकडून गोड बोलून, काहीतरी आमिष दाखवून, वेळ पडल्यास फसवून, धमकाऊन, ओरबाडून-हिसकाऊन घ्यायचं… पैसा, वस्तू, पद, पुरस्कार, सत्ता… मिळेल ते कसं घ्यायचं आणि ते स्वतःसाठी साठवून कसं ठेवायचं या विचारात ते सतत अस्वस्थ असतात.
दुसर्या प्रकारची माणसं आपल्याकडे जे आहे ते गरजूंना, गरीबांना, शोषित-पिडीतांना, समाजाला देऊन टाकतात…बदल्यात कशाचीही अपेक्षा न करता ! ज्ञान, विचार, स्वकष्टानं कमावलेला घामाचा पैसा… समाजाच्या भल्यासाठी नि:स्वार्थीपणे देऊन टाकायचे अशी त्यांची वृत्ती असते. हे करताना कितीही अडचणी आल्या, संकटं आली, अपमान झाले, तरी ते हसत-हसत सहन करतात.
एरिक फ्रॉमच्या मते माणसाचं खरं ‘माणूसपण’, जगण्याचा नितळ, निरामय आनंद, सुख हे दुसऱ्या प्रकारच्या प्रवृत्तीत आहे. अधाशासारखं मिळवून फुगलेल्या संख्येत विकृत आनंद शोधणारी माणसं सतत अतृप्त असतात.
अशा दोन प्रवृत्तीच्या लोकांचे दोन समूह आज भवताली दिसतात. एका झुंडीला ओरबाडून, हिसकावून, धमकाऊन ‘संख्या’ वाढवायचीये. वाममार्ग वापरून ती ‘चारसो के पार’ वगैरे न्यायचीय… मिळवलेला अमाप पैसा दडपून ठेवायचाय… त्या चिंतेत ते सतत अस्वस्थ आहेत… चिडचिडे आहेत… शिव्याशाप देतात…त्यांचे म्होरके तारस्वरात ओरडत, किंचाळत स्वत:चं गुणगाण गातात. पण त्यांच्याकडं सर्वसामान्य समाज संशयानं, तिरस्कारानं बघतोय.
दुसर्या प्रकारचे लोक संख्येचा, संपत्तीचा, सत्तेचा विचार न करता गोरगरीब समाज गुलामीत जाऊ नये… बहुजनांचे शोषण होऊ नये यासाठी झटताहेत. कुणी अर्वाच्य शब्दांत ट्रोल होतोय, कुणी जनजागृतीसाठी लाठ्याकाठ्यांचा मार झेलतोय. कुणाचे काम हिसकावून घेऊन पोटावर पाय आणला जातोय. कुणाचे पुरस्कार लुबाडले जाताहेत तर कुणाचा पक्ष. कुणाला सत्तेवरून रातोरात हटवलं जातंय, तर कुणाला तुरूंगात डांबलं जातंय… पण ते सगळे खुप समाधानी दिसताहेत. बॅलन्सड-कंपोज्ड आहेत. हसत-हसत सगळं झेलताहेत. यांचे प्रतिनिधी कर्कश्श किंचाळत भाषणं ठोकण्यापेक्षा शांतपणे, आपुलकीने संवाद साधताहेत. बोलण्यात कळवळा आहे… आणि त्यामुळे त्या सगळ्यांना समाजाचे अफाट, अद्भूत, अवर्णनीय आणि ‘खरे’ प्रेम मिळतेय !
तुम्ही कुठल्या समूहात आहात ?
- किरण माने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत