पण अमावस्या नसतानाही खग्रास सूर्यग्रहण…? माता रमाईंच्या पवित्र स्मृतीस दैनिक जागृत भारत तर्फे विनम्र अभिवादन

अमावस्येला सूर्यग्रहण लागलेले जगाने अनेकदा पाहिले आहे. पुढेही लागत राहाणार… पण अमावस्या नसतानाही खग्रास सूर्यग्रहण…? हो…! एकदा लागले आहे !! जगाने अनुभवले आहे !!!
२७ मे, १९३५…! ‘साहेबा’ची ‘रामू’ गेली अन् दलित, पीडित, शोषित, सर्वहारा समाजाचे जग अंधारात बुडाले ! तळपत्या सूर्याच्या सावलीने या जगाचा कायमचा निरोप घेतला आणि साक्षात सूर्याला रडू कोसळले…! निरोप घेण्यापूर्वी साहेबांचा हात आपल्या थरथरत्या हातात घेऊन रमाबाई बाबासाहेबांना म्हणाल्या, “साहेब ! माझ्या सात कोटी लेकरांवर लक्ष ठेवा… त्यांची काळजी घ्या… त्यांना मान-सन्मान जरूर मिळऊन द्या…” बस… हेच अंतिम शब्द होते त्यागमूर्ती रमाबाईंचे ! ज्या माऊलीने शेवटच्या श्वासापर्यंत केवळ देण्याचे काम केले, ती आज आपल्याला काही मागत आहे, हे ऐकून पाषाणालाही पाझर फुटला असता. ते तर रामूचे साहेब होते ! बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले. पण विचलित झाले नाहीत ! कारण ‘तेथी’ल सूर्याला या ‘येथी’ल सूर्याने सांगून ठेवले होते…
तू तिथला
तर मी इथला सूर्य आहे
तू ताऱ्यांना प्रकाशमान कर
मी साऱ्यांना प्रकाशमान करतो…!
आणि बाबासाहेब दिल्या शब्दाला जागले. रात्रीचे दिवस केले. अंधाऱ्या वस्त्यांवर त्यांनी दिवे लावले ! या कामी खडतर काळात रमाबाईंची बाबासाहेबांना समर्थ साथ मिळाली नसती तर !… ही कल्पनाही करवत नाही. गणितामध्ये एक अधिक एक दोन होतात. ही साधी बेरीज ! पण इथे एक अधिक एक अकरा झाले !! यातच रमाईचे महात्म्य दडले आहे !!!
स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर आईला मनोभावे अभिवादन करताना कुणाचा कंठ दाटून येणार नाही ? येणारच !
बस… एकच करू या…
वामनदादा कर्डक या महाकवी, आंबेडकरवादी चळवळीचे मुक्त विद्यापीठ, बाबासाहेबांना डोळे भरून पाहात त्यांना नि त्यांच्या संघर्षमय चळवळीला खेडेपाडे, वाडे, तांड्यावर पोहचविणाऱ्या ‘शब्दकुबेर’ सच्चा ‘भीमफकिरा’ला याद
करू या…
“इथे कुणाचेच काही कष्ट नाही
ही तुझीच कमाई आहे गं भीमाई”
ह्या दोन ओळी इमानदारीने काळजावर गोंदऊन घेत वाटचाल करू या…!
“बाबांच्या रामूला आणि आपल्या आईला कोटी कोटी प्रणाम !!!”🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत