महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३३ (१० जुलै २०२४)
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(अस्पृश्यांचा शोध किंवा अस्पृश्य पूर्वी कोण होते? क्रमशः..)
प्रारंभीक समाज मूलतः टोळ्यांनी बनला होता ही बाब स्पष्ट करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील दोन निष्कर्ष मांडले आहेत.
१. आदिम समाजातील प्रत्येक व्यक्ति कोणत्यातरी टोळीची असे. इतकेच नव्हेतर, असे असणे अपरिहार्य होते. टोळीच्या बाहेरील कोणतीही व्यक्ति अस्तित्वात नव्हती.
२. टोळ्यांचे संबंध हे रक्त संबंधांवर आणि नाते संबंधांवर होत असल्यामुळे एका टोळीत जन्मलेली व्यक्ति दुसऱ्या टोळीत सामील होऊन सभासद होऊ शकत नव्हती. त्यामुळे, पराभूत होऊन वाताहत झालेल्या लोकांना एकट्या दुकट्याने जीवन जगावे लागत होते.
प्रारंभीक समाजामध्ये जेव्हा टोळी विरुद्ध टोळी असे युद्ध होत असे, तेव्हा वाताहत झालेल्या अशा एकट्या दुकट्या व्यक्तीला आपल्यावर हल्ला होण्याचा फार मोठा धोका वाटत असे. त्यामुळे, आश्रयस्थान आणि स्वसंरक्षण हीच या वाताहत झालेल्या लोकांची समस्या होती.
प्रारंभीक समाजाच्या उत्क्रांतीच्या विश्लेषणावरून बाबासाहेबांनी आदिम समाजाच्या काळामध्ये दोन प्रकारचे लोकसमूह काही काळ अस्तित्वात असल्याचे स्पष्ट केले आहे.
१. पहिला लोक समूह म्हणजे एका ठिकाणी स्थायी झालेल्या लोकांचा समूह होय.
२. दूसरा लोक समूह किंवा गट म्हणजे पराभूत (वाताहत) झालेल्या लोकांचा समूह.
या दोन लोकसमूहांनी परस्परात करार करून आपापले प्रश्न सोडविले. या करारानुसार वाताहत झालेल्या लोकांनी स्थायी झालेल्या जमातींचे संरक्षण व टेहळणी करण्याचे स्वीकारले व त्याच्या बदली त्यांना अन्न आणि आश्रय देण्याचे स्थायी जमातीने मान्य केले. एकाच्या सहकार्याची गरज दुसऱ्याला असतांना अशा परिस्थितीत केलेली तडजोड स्वाभाविकच होती. अशा प्रकारचा करार असून सुद्धा वाताहत झालेल्या लोकांनी स्थायी जमातीच्या वस्तीत राहावे की वस्ती बाहेर, आश्रयाची ही समस्या निर्माण झाली. या समस्येवर निर्णय घेताना पुढील दोन बाबी महत्वाच्या ठरल्या. पहिली बाब, रक्ताच्या नात्याची व दुसरी बाब म्हणजे, डावपेचाची.
प्रारंभीक समाजाच्या श्रद्धेनुसार केवळ एका टोळीत एका रक्ताचे लोकचं एकत्र राहू शकत होते. एखाद्या टोळीच्या मालकीच्या असलेल्या मायभूमीमध्ये परक्या माणसाला वस्ती करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नव्हती. वाताहत झालेले लोकं परके होते. ते स्थायी जमातींच्या टोळीपेक्षा दुसऱ्या टोळीतले होते. त्यामुळे त्यांना स्थायी जमातीमध्ये वस्ती करण्यास अनुमती देणे शक्य नव्हते. डावपेचाच्या दृष्टिकोनातून पहिले तर वाताहत झालेल्या लोकांनी गावाच्या सीमेवर राहणेच अधिक उपयुक्त होते. कारण, त्यांना शत्रू टोळ्यांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागत होते. या दोन्ही बाबी निर्णायक असून, वाताहत झालेल्या लोकांची घरे गावाबाहेर असावी या मताला पुष्टी देणारे आहेत. परंतु, ज्या वाताहत झालेल्या लोकांना गावाच्या सीमेवर राहण्यास परवानगी दिली त्यांचा सामाजिक दर्जा हा स्थायी लोकांपेक्षा खालचा ठेवण्यात आला. स्थायी लोकांनी वाताहत झालेल्या लोकांशी खान-पान, विवाह संबंध प्रस्थापित करणे निषिद्ध मानले. त्यांच्यात मालक-मंजूर असे संबंध राहिले.
जेव्हा आदिम समाजाचे रूपांतर भटक्या जमातींमधून गावांमधील स्थायी समाजात झाले, तेव्हा वरील प्रकारची प्रक्रिया भारतात देखील घडून आली असली पाहिजे. आदिम समाजामध्ये स्थायी जमाती व वाताहत झालेले
लोकं असले पाहिजेत. स्थायी टोळ्यांनी गावे वसवली व ग्राम जमाती निर्माण केल्या, आणि वाताहत झालेले लोकं खेड्याबाहेर स्वतंत्र वस्त्यांमध्ये राहू लागले. कारण, ते वेगळ्या टोळीतील, म्हणून वेगळ्या रक्ताचे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे असे नमूद करतात की, अस्पृश्य लोकं हे वाताहत झालेले लोकं होते. म्हणून, ते गावाबाहेर राहत होते, आणि म्हणूनच त्यांचा सामाजिक स्तर देखील सर्वात खालचा राहिला.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत