हिंगोली तालुक्यात पतीच्या मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यू.

हिंगोली तालुक्यातील इसापूर रमणा येथे किरकोळ कारणावरून पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२ ऑक्टोबर) सकाळी ११.३० वाजता घडली आहे. बासंबा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणात फरार आरोपीला पोलिसांनी अंभेरी शिवारातून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसापूर रमणा येथील माधव यशवंत जगताप हा शेती करतो. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तो घरात जेवण करीत असताना त्याचे त्याची पत्नी द्वारकाबाई जगताप यांच्याशी शाब्दिक वाद झाला. काही वेळातच वाद वाढत गेल्याने माधव याने द्वारकाबाई यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे त्या घराबाहेर पळाल्या असताना माधव याने त्यांना दगड मारला. त्याने मारलेला दगड छातीमध्ये लागल्यामुळे त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या माधवने तेथून पळ काढला.
या प्रकारानंतर गावकऱ्यांनी द्वारकाबाई यांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बासंबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी, जमादार खंडेराव नरोटे, प्रवीण राठोड, संतोष मोरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी माधवचा शोध सुरू केला. त्यासाठी पथके पाठवण्यात आली. दुपारी तो अंभेरी शिवारातील एका शेतात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत