
आज संसदीय कामकाज नव्या संसद भवनात स्थलांतरित होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी आज संसद भवन परिसरात पूर्ण करण्यात आली. देशाच्या 75 वर्षांच्या संसदीय परंपरेचा अविभाज्य घटक राहिलेले जुने संसद भवन मंगळवारी (19 सप्टेंबर) इतिहासजमा होणार आहे. तत्पूर्वी, विद्यमान 17 व्या लोकसभेतील सर्व खासदारांचे एकत्रित छायाचित्र उद्या जुन्या संसद भवनात काढले जाईल. त्यानंतर नव्या इमारतीत स्थलांतर होईल. त्यासाठी सर्व खासदारांना राज्यघटनेची प्रत देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी राज्यघटनेची प्रत सोबत घेऊन नव्या संसद भवनात प्रवेश करतील, असे समजते.
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 75 वर्षांच्या संसदीय परंपरेचा लेखाजोखा मांडणारी चर्चा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये झाली. यात कनिष्ठ सभागृह लोकसभेमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यमान संसद भवनाला निरोप देताना त्यातील ऐतिहासिक स्मृतींना उजाळा दिला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील खासदारांनीही संसद भवनाशी असलेल्या भावनिक नात्याच्या आठवणी मांडल्या. जुन्या संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात (सेंट्रल हॉल) उद्या सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार एकत्र येणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थलांतराआधी या मध्यवर्ती कक्षाजवळच्या भागात विद्यमान संसदेतील सर्व खासदारांचे एकत्रित फोटोसेशन होईल.
मिरवणुकीने नव्या संसदेत-फोटोसेशनच्या आधी मध्यवर्ती कक्षामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त धार्मिक विधी होणार असून, सर्व खासदारांसाठी मेजवानी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर मिरवणुकीने दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी तसेच पंतप्रधान मोदींसह सर्व खासदार नव्या संसद भवनात प्रवेश करतील. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभागृह नेते व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसद भवनाच्या परिसरात या तयारीची आणि पंतप्रधानांच्या संभाव्य मिरवणूक मार्गाची पाहणीदेखील केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत