राज्यातील पोलीस हतबल; उद्धव ठाकरे

शिंदे गटाकडून जमीनदोस्त करण्यात आलेल्या मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखेला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी दुपारी आले होते. याठिकाणी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांना आवाहन केले. सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली. पण, खरा बुलडोझर घेऊन मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. आमचे बॅनर फाडल्याचे कळले. पण, निवडणुका येऊद्या तुमची मस्ती फाडतो, असा इशारा त्यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे दिला. राज्यातील सरकारने पोलिसांना आधी वारकऱ्यांवर, त्यानंतर मराठा आंदोलकांवर हल्ला करायला लावला आणि आता मुंब्य्रात शाखा चोरांचे संरक्षण करायला लावले आहे. मी राज्यातील पोलिसांना दोष देत नसून ते हतबल आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात केली. हिम्मत असेल तर पोलीस संरक्षण बाजूला ठेवून भिडा, असे खुले आव्हान शिंदे गटाला देत राज्यात जिथे या चोरांची गुंडागर्दी दिसेल, तिथे जाब विचारण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. शाखेला भेट देणार असल्याचे मी दोन दिवस आधीच जाहीर केले होते. पोलिसांनी तिकडे भाडोत्री गुंडांना येऊ द्यायला नको होते पण, पोलिसांनी त्यांना तिथे येऊ दिले. पोलिसांचे धन्यवाद मानतो. कारण, त्यांनी शाखाचोरांचे रक्षण केले. प्रशासन हतबल झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज येथे काही घडले असते, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. सत्तेची गादी भोगणाऱ्यांनी आधीच महाराष्ट्राची अब्रू घालवली आहे, असेही ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत