
नाशिक दि. २५ मे (प्रतिनिधी):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची जबाबदारी बौद्ध धम्माला साजेशी सामाजिक पुनर्बांधणी करून आदर्श बौद्ध समाज घडविण्याची आहे, बौद्ध वस्त्यांतून बहुजनवाद जोपासण्याची नव्हे; असे परखड प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी नाशिक येथे बोलताना केले.
मातृभूमी प्रबोधन समिती व शासनमान्य म. फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने जेलरोड, नाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन या संस्थेच्या इमारतीतील बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेच्या दुसर्या वर्धापनदिनानिमित्त ‘ बौद्ध धम्म व आंबेडकर अनुयायांची जबाबदारी ‘ या विषयावर प्रा.देवडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आयु. राजेंद्र काशिनाथ जाधव हे होते.
प्रा. आनंद देवडेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही मूल्यांची कदर करणारा समाज आकारास यावा यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धमय भारताची घोषणा केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारलेल्या आंबेडकर अनुयायांनी दलितत्वाचं वा संभ्रमित करणाऱ्या बहुजनवादाचं नव्हे; तर बौद्ध धम्म प्रसाराचं मिशन गतिमान करून बौद्ध म्हणून आपली आयडेंटिटी प्रस्थापित करायला हवी,असेही प्रा. देवडेकर शेवटी आपल्या भाषणात म्हणाले.
या प्रसंगी आयुष्याची बहुमोल वर्षे खर्ची घालून संस्थेत निरपेक्ष सेवा देणारे संस्थेचे विश्वस्त आयु. दामोदर धोंडीराम साळवे, आयु. शामराव विश्राम बागुल, आयु.नंदकिशोर दामोदर साळवे, आयु. संतोष यशवंत जोपुळकर, आयु. प्रकाश खंडेराव गांगुर्डे, आयु. रामदास मोतीराम खरे, आयु. बाळासाहेब मल्हारी लोखंडे व आयु. महेंद्र गणपत साळवे इत्यादींना प्रा. आनंद देवडेकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त सत्कारार्थींच्या वतीने नंदकिशोर साळवे यांनी सत्कारास उत्तर देणारं मनोगत व्यक्त केलं.
या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदराम दिवे यांनी केलं तर प्रास्ताविक सुधीर भालेराव यांनी केलं. संजय आनंदा साळवे यांनी आभारप्रदर्शन केलेल्या या कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये प्रा. गंगाधर अहिरे, करुणासागर पगारे, प्रकाश दोंदे यांच्यासह संस्थेशी संबंधित अनेक मान्यवरांसोबत स्त्रियांची उपस्थितीही लक्षणीय होती. शेवटी भोजनदानाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत