सेन्सेक्स-निफ्टी नव्या यशाकडे

देशात सोन्याच्या भावात दिसून आलेल्या लक्षणीय वाढीने, सोमवारी प्रति १० ग्रॅम ६४,००० रुपयांचा कळस गाठला. चांदीच्या भावातही किलोमागे १,००० रुपयांची वाढ होऊन, ते ८० हजार रुपयांपुढे गेले. रविवारी चार राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांचे भांडवली बाजारांत जोरदार स्वागत झाले. सोमवारी सलग पाचव्या सत्रात मोठ्या वाढीसह सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी अत्युच्च पातळीवर स्थिरावले. यामुळे एका दिवसात मुंबई भांडवली बाजाराचे मूल्य ३४३.४८ लाख कोटींच्या नव्या उच्चांकावर पोहोचले आहे.
चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपच्या बाजूने मतदारांचा कौल आल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार येण्याची शक्यता बळावल्याचे मानले जाते. भांडवली बाजारांनी याचे जोरदार स्वागत केले. परिणामी सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १,३८३.९३ अंशांनी (२.०५ टक्के) वाढून ६८,८६५.१२ अशा सार्वकालिक उच्चांकावर बंद झाला. या निर्देशांकाने दिवसांतर्गत ६८,९१८.२२ अशा अत्युच्च शिखरालाही गवसणी घातली. सेन्सेक्सने २० मे २०२२ नंतर नोंदवलेली एका सत्रातील ही सर्वात मोठी उडी आहे. व्यापक प्रतिनिधित्व असलेला निर्देशांक, ‘निफ्टी’नेदेखील सोमवारच्या सत्रात ४१८.९० अंशांची (२.०७ टक्के) वाढ नोंदवून २०,६८६.८० या सार्वकालिक उच्चांकाला गाठले. निफ्टीचे घटक असणाऱ्या ५० समभागांपैकी, ४४ भावातील मोठ्या वाढीसह बंद झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत