प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण भाग १९

मागील भागात
१. अविद्या (Ignorance, Lack of Knowledge)
२. संस्कार (Conception)
३. विज्ञान (Consciousness) ४. नामरूप (Mind and Body) या कड्यांबद्दल माहिती घेतली.
आता या भागात पुढील कड्यांची माहिती घेऊया.
५) षडायतन (Sixfold Base)
प्रतित्यसमुत्पादाची पाचवी कडी म्हणजे षडायतन. नामरुपामुळे षडायतन उत्पन्न होतात.
षडायतन म्हणजे सहा आयतने. ते म्हणजे डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन.
येथे डोळ्याचे आयतन म्हणजे पाहण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता. कानाचे आयतन म्हणजे ऎकण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता. नाकाचे आयतन म्हणजे वास घेण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता. जिभेचे आयतन म्हणजे चव घेण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता. त्वचेचे आयतन म्हणजे स्पर्श जाणण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता. मनाचे आयतन म्हणजे कल्पना, विचार जाणण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.
नामरुपाचा निरोध केला असता षडायतनचा निरोध होतो.
६) स्पर्श
प्रतित्यसमुत्पादाची सहावी कडी म्हणजे स्पर्श. षडायतनामुळे स्पर्श उत्पन्न होतात.
जेव्हा चक्षूरुप आणि चक्षूविज्ञान यांचा संबंध येतो तेव्हा त्या संबंधाला स्पर्श असे म्हणतात. स्पर्श म्हणजे ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय विषय आणि ज्ञानेंद्रिय विज्ञान यांचा समन्वय होणे.
पाच इंद्रियांच्या क्रियेला मनाने दिलेले आदेश यांच्या परस्पर संबंधातून आपण बाह्यजगाशी संपर्क प्रस्थापित करीत असतो. जसे आपण जर पुस्तकातील अक्षरांकडे पाहिले तर नेत्रस्पर्श, कानाला कुणाचा आवाज ऎकू आला तर कर्णस्पर्श, नाकाला कसलातरी गंध आला तर घ्राणस्पर्श, काही खात असताना जिभेला चव कळली तर जिव्हास्पर्श, त्वचेला कसलातरी संपर्क आला तर त्वचास्पर्श असे या पाचही इंद्रियाला त्या त्या विषयाचा स्पर्श होत असतो. या सर्व क्रियावर मनाचे अधिराज्य असते. मन जर नसेल तर कोणताही स्पर्श जाणवणार नाही.
षडायतनचा निरोध केला असता स्पर्शाचा निरोध होतो.
७) वेदना
प्रतित्यसमुत्पादाची सातवी कडी म्हणजे वेदना. स्पर्शामुळे वेदना उत्पन्न होतात.
वेदना म्हणजे इंद्रियांचा इंद्रिय विषयांशी संपर्क आला असता जाणवणारी अनुभूती. एखाद्या बाह्यस्थितीचा आपल्या ज्ञानेंद्रियाला स्पर्श होताच जे तरंग शरीरात निर्माण होतात ते म्हणजेच वेदना. वेदना कशी निर्माण होते ते मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे.
वेदना तीन प्रकारच्या आहेत. सुखमय वेदना, दु:खमय वेदना व सुखमय व दु:खमय वेदना.
एखादे रुप पाहिल्याने, आवाज ऎकल्याने, वास घेतल्याने, चव घेतल्याने, स्पर्श केल्याने व मनात कल्पना किंवा विचार आल्याने संवेदना निर्माण होत असतात. त्या सहा प्रकारच्या संवेदना डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन अनुभवत असतो. जेव्हा ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय विषय आणि ज्ञानेंद्रिय विज्ञान यांचा समन्वय झाल्याने स्पर्श होतो, तेव्हाच संवेदना निर्माण होत असतात. म्हणून स्पर्शामुळे वेदना निर्माण होत असतात.
स्पर्शाचा निरोध केला असता वेदनेचा निरोध होतो.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१.१.२०२४
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर करीत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत