नांदेडमधील शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू, विरोधकांचं सरकारवर टीकास्र.

नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( २ ऑक्टोबर ) समोर आली. मृतांमध्ये ६ मुले आणि ६ मुलींचा समावेश आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर, शिंदे सरकारवर सर्व स्तरातून टीकास्र सोडलं जात आहे.
विष्णुपुरी परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आहे. रुग्णालयात गेल्या २४ तासांत ६ मुले व ६ मुली या १२ बालकांसह सात स्त्रिया आणि पाच पुरुष दगावले आहेत. मृतांमध्ये सर्पदंश, विषप्राशन तसेच अन्य आजारांचेही रुग्ण होते. यातील काही जण परराज्यातील असल्याचे सांगण्यात आलं.यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दुर्घटनेबाबत माहिती घेतली जाईल. त्यावर जे काही उपाय आहेत, ते केले जातील,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
या घटनेबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “रूग्णालयाच्या अधिष्ठांशी चर्चा केली आहे. परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे. वैद्यकीय महाविद्यालय असल्यानं शासनानं तातडीनं कारवाई आणि मदत करण्याची आवश्यकता आहे.”
“ठाण्यातील महापालिका रूग्णालयात झालेल्या मृत्यूनंतर अन्य ठिकाणीही या घटना घडत आहे. कारण, हाफकिनकडून औषधांची खरेदी करण्यात आलेली नाही. अनेक वैद्यकीय आणि सरकारी रूग्णालयांत लोकांचा मृत्यू होत आहे. या मृत्यूंना सरकार जबाबदार आहे,” असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत