राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा बसला तडाखा.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून या अस्मानी संकटामुळे राज्यभर हजारो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
आग्नेयकडून आलेले बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून आलेल्या थंड वाऱ्याच्या संयोगातून राज्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात गारपिटीचा इशारा दिला होता, मात्र तेवढ्या मोठ्या क्षेत्रावर गारपीट झाली नाही. गारपीट झालेल्या पुणे, नगर, नाशिकमध्ये फळपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. द्राक्षांच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. झाडाला पान, फळ राहिले नाही. केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे मोडून पडल्या आहेत. गारांचा मारा बसल्यामुळे पपई फळे खराब झाली आहेत. डाळिंबही हातचे गेले आहे. काढलेला कांदा आणि लागवड केलेला कांदा गारांच्या तडाख्याने खराब झाला आहे. गारपीट झालेल्या भागात सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे भाजीपाला आणि मळणी केलेल्या भाताचे नुकसान झाले. आगामी रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात आली आहेत. काही शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली. गारपीट झालेल्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांत फळे, रब्बी पिके आणि भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळीने मराठवाडा आणि विदर्भात वेचणीला आलेला कापूस, काढणीला आलेली तूर त्याचबरोबर भाताच्या पिकाची नासधूस केली. मात्र, अपुऱ्या पावसामुळे अडचणीत आलेल्या रब्बी हंगामातील पिकांना मात्र पावसाने दिलासा दिला आहे.
अवकाळी पावसाचा जोर विदर्भ, मराठवाड्यात जास्त होता. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळला पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. या जिल्ह्यांत वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजला आहे. त्यामुळे पांढरे सोने काळवंडण्याचा धोका आहे. मराठवाडा आणि विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे नुकसानीची तीव्रता जास्त आहे. कापसासह काढणीला आलेली तूर पावसात भिजल्यामुळे दर्जा घसरण्याची शक्यता आहे. विदर्भ, पश्चिम घाट आणि किनारपट्टीवरील काढलेले आणि झोडणी सुरू असलेले भातपीक भिजले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत