सावित्री माय.. तुझ्या लेकरांच अभिवादन !

त्यांचा धर्म जेव्हा सांगत होता;
बालपणी तिने बापाच्या आज्ञेत रहावे.
तारुण्यात भावांच्या नजरेच्या गुलामीत करावं नखाकडे पाहुन जीवन व्यतित.
विवाहानंतर कुंकवाच्या धन्याच्या मालकी हक्काचा मारुन घ्यावा शिक्का भाळी.
अन् म्हातारपणात……
आपल्याच उदरात नवमहिने ओझं वागवलेल्या मरणाशी झुंजत जग दाखवलेल्या लेकरांनी दिलेला दयेचा कुटका गिळत मरण येईपर्यंत जगावं लाचार जीणं येखाद्या कोनाड्यात.
त्यावेळी लाभला तुला धनी बाईचे साखळदंड तोडणारा.
तिला ज्ञानपथावर आणून शहाणं करुन सोडणारा.
त्या क्रांतिबाच्या क्रांतिपथाची तु केवळ वाटसरुच झाली नाही.
तु त्याच्या संगतीनं क्रांतिच्या-ज्ञानाच्या निखार्यावरुन चालु लागलीस अवघ्या आयाबायांना शहाणंसुरतं करत.
गुलामीच्या पुरुषी धर्म-अधर्माच्या साखळदंडातुन मोकळं ढाकळं करीत.
तुझा क्रांतिचा ज्ञानदीप विझला म्हणून काय झालं?
त्यानं तुला दाखवुन ठेवला होता मार्ग मुक्तिचा.
जाती-धर्मांच्या गुलामीतुन मुक्त व्हायचा.
तु चालत राहिलीस वाट अखंडाची.
तु पेरीत गेलीस सुरुंग सत्यशोधक धर्माचे.
तु जखडबंद बाईला दाखवलास मार्ग मुक्तीचा जसा मुक्ता साळवेला,तस्साच फातिमा शेखलाही,वाणी-बामणीला,मराठी-मायवतणीला,साळी-माळी,कुणबी-कुंभारणीला.
तेव्हाही आली होती अशीच महामारी प्लेगची.
भेजात अंध:काराचा काळोख भरुन कुणा अधर्माचे दिवे शीलगावत अन् टाळ्या वाजवत आज जस्सी अज्ञानाची धर्मवेडी मगरमिठी घातली जाते.
अगदी तस्सेच त्याही वेळी प्लेगची महामारी हटवायसाठी केले जात होते महायज्ञ.
मरणार्यांना भूकेनेही तडफडत मारत यज्ञांमध्ये दूध-तुपाची-अन्नाची दिली जात होती आहुती.
अधर्माच्या रक्षणासाठी जस्सी घातली होती गोळी गांधीबाबाला.
अगदी तस्सीच प्लेगच्या उपचारातुन वाचवायसाठी औषधोपचाराचा अधर्म माजवणार्या रँड साहेबाला गांधीबाबाच्याही पन्नास वर्षे अगुदर घातली होती गोळी माणसं महामारीच्या नरड्यात ढकलत धर्म वाचवायसाठी.
त्यावेळी तु महामारीच्या नरड्यातलं मरणाचं तांडव रोखायसाठी उतरली मैदानात.
सैन्यात डॉक्टरी करणार्या लेकराला घातलीस हाळी माणसाचं मरण रोखायसाठी.
तुलाही प्लेगनं केलं शिकार तुझी माणसं वाचवायची झुंज रोखायसाठी.
पण,तु कर्मकांडांचे साखळदंड तोडणारी आणि कुमारी बामणीनीचं बाळंतपण करुन तिच्या लेकाचीही माय होणारी माय होतीस सिद्धार्थाची.
मरण तुला आडवु कसं शकेल बरं?
तु भीमाचीही माय,तु माता रमाईची माय.
तु माक्झीम गार्कीची माय,तु हजार चौरासीर माय.
तु धर्मयुद्धात बळी घेतलेल्या तडफडत मरणार्या प्रत्येक निरपराध लेकराची माय.
सावित्री माय; तुला तुझ्या स्मृतिदिनी प्रत्येक लेकराचे विनम्र अभिवादन!
-जयवंत हिरे.
"क्रांतिकारी जनता"
१० मार्च २०२१.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत